Diabetes: “फक्त आहार नव्हे, तणावही ठरतो मधुमेहाचे कारण- तज्ज्ञांचा इशारा”

Diabetes: मधुमेह हा आज भारतातील सर्वात वेगाने वाढणारा आजार मानला जातो. केवळ मोठ्या शहरांतच नव्हे तर ग्रामीण भागातही मधुमेहाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. ‘साइलेंट किलर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या आजाराने लाखो लोक त्रस्त आहेत. तज्ज्ञांच्या मते, चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव आणि असंतुलित जीवनशैली हे मधुमेहाचे मुख्य कारण असले तरी, मानसिक ताणतणाव हाही एक गंभीर घटक आहे.
तणावाचा शरीरावर परिणाम
मानसिक तणाव हा आजच्या वेगवान जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनला आहे. कौटुंबिक अडचणी, नोकरीतील दबाव, आर्थिक ताण किंवा वैयक्तिक समस्या,या सर्व गोष्टींमुळे मनावर ताण येतो. तणावाच्या काळात शरीरात कोर्टिसोल नावाचे संप्रेरक मोठ्या प्रमाणात स्रवते. हे संप्रेरक इन्सुलिनच्या कार्यक्षमतेत अडथळा आणते. त्यामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढते आणि कालांतराने मधुमेहाची जोखीम निर्माण होते.
तणावामुळे वाढणारा धोका
अनेक संशोधनांतून हे स्पष्ट झाले आहे की मानसिक ताण हा केवळ मनावरच नाही तर शरीरावरही परिणाम करतो. ताणतणाव दीर्घकाळ टिकला तर तो मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार अशा गंभीर आजारांना आमंत्रण देतो. विशेषत: ज्या लोकांच्या कुटुंबात मधुमेहाचा इतिहास आहे, त्यांना तणावामुळे हा आजार लवकर होण्याची शक्यता जास्त असते.
डॉक्टरांचा सल्ला आवश्यक
तज्ज्ञ सांगतात की, मधुमेहाची लक्षणे सुरुवातीला सौम्य असतात, जसे की सतत तहान लागणे, वारंवार लघवी होणे, थकवा, वजन घटणे किंवा दृष्टी धूसर होणे. ही लक्षणे दुर्लक्ष करू नयेत. वेळोवेळी तपासणी करणे आवश्यक आहे. ज्यांना आधीच मधुमेह आहे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे, आहार आणि दिनचर्या यावर विशेष लक्ष दिले पाहिजे.
काय करावे?
मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि तणाव टाळण्यासाठी जीवनशैलीत काही बदल करणे अत्यंत गरजेचे आहे.
संतुलित आहार: फायबरयुक्त अन्न, भाज्या, फळे, डाळी, संपूर्ण धान्य यांचा समावेश करावा. गोड, तळलेले आणि फॅटयुक्त पदार्थ शक्यतो टाळावेत.
नियमित व्यायाम: रोज ३०-४५ मिनिटे चालणे, धावणे, योगा किंवा मेडिटेशन केल्याने तणाव कमी होतो आणि रक्तातील साखर नियंत्रित राहते.
पुरेशी झोप: दररोज ७-८ तासांची चांगली झोप घेणेही तणाव कमी करण्यास मदत करते.
धूम्रपान आणि मद्यपान टाळा: या सवयींमुळे रक्तातील साखर आणि इतर आजारांचा धोका वाढतो.
तणावमुक्त राहा: छंद जोपासा, कुटुंबासोबत वेळ घाला आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवा.
मधुमेह हा एकदा झाल्यावर आयुष्यभर नियंत्रित ठेवावा लागणारा आजार आहे. परंतु योग्य जीवनशैली, संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि मानसिक तणावावर नियंत्रण ठेवल्यास हा आजार मोठ्या प्रमाणात टाळता किंवा नियंत्रित करता येतो. त्यामुळे शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याचीही काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.





