Dia Mirza Birthday: बॉलिवुडची सदाबहार आणि मोहक अभिनेत्री दीया मिर्झा आजही आपल्या साधेपणाने आणि अभिनय कौशल्याने चाहत्यांची मने जिंकते. 20 व्या वर्षी मॉडेलिंगपासून सुरुवात केलेल्या दियाने आपल्या मेहनतीच्या जोरावर बॉलिवुडमध्ये खास ओळख निर्माण केली. 9 डिसेंबरला जन्मलेली दीया चित्रपटांसोबतच सामाजिक कार्य, पर्यावरण संरक्षण आणि महिला सशक्तीकरणासाठीही सतत कार्यरत असते. हैदराबादमध्ये जन्म, बालपणातील संघर्ष दीया मिर्झाचा जन्म 9 डिसेंबर 1981 रोजी हैदराबाद येथे झाला. त्यांचे वडील फ्रँक हँडरिच हे जर्मन ग्राफिक आणि आर्किटेक्चर डिझायनर होते, तर आई दीपा मिर्झा बंगाली इंटीरियर डिझायनर व लँडस्केप आर्टिस्ट आहेत. दीया केवळ साडे-चार वर्षांची असतानाच त्यांच्या आई-वडिलांचा विभक्त होण्याचा निर्णय झाला. तिने अंबेडकर ओपन युनिव्हर्सिटीमधून बी.ए. पदवी पूर्ण केली आणि शिक्षणासोबत एका मीडिया कंपनीत मार्केटिंग एग्झिक्युटिव्ह म्हणून कामही सुरू केले. कॉलेजपासून सुरू झाली मॉडेलिंगची वाटचाल कॉलेजमध्ये असतानाच दियाने मॉडेलिंगला सुरुवात केली. अनेक नामांकित ब्रँड्सच्या जाहिरातींमध्ये ती झळकली आणि तिची लोकप्रियता झपाट्याने वाढली. साल 2000 तिच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला ती मिस इंडिया स्पर्धेत रनर-अप ठरली आणि नंतर मिस एशिया पॅसिफिक इंटरनॅशनल 2000 हा किताब जिंकून भारताचे नाव उज्ज्वल केले. फक्त 18 वर्षांच्या वयात मिळालेलं हे यश आजही अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. बॉलिवुडमध्ये चमकलेलं करिअर दियाने बॉलिवुडमध्ये पदार्पण केलं 2001 मध्ये ‘रहना है तेरे दिल में’ या चित्रपटातून. रीना मल्होत्रा या तिच्या भूमिकेतील निरागसता आणि मोहक व्यक्तिमत्त्व प्रेक्षकांच्या मनात आजही ताजं आहे. यानंतर दियाने, संजू, थप्पड, अॅसिड फॅक्टरी, शूटआउट अॅट लोखंडवाला, सलाम मुंबई सारख्या चित्रपटांमध्ये प्रभावी भूमिका साकारल्या. ग्लॅमरच्या पलीकडील ‘ग्रीन दिवा’ अभिनयासोबतच दीया सामाजिक आणि पर्यावरणीय कार्यासाठी ओळखली जाते. ती संयुक्त राष्ट्रांची गुडविल अॅम्बेसेडर आहे आणि पर्यावरण संरक्षण, महिला हक्क, शिक्षण अशा विषयांवर सतत आवाज उठवते. 2019 मध्ये ‘वन इंडिया स्टोरी’ ही स्वतःची प्रॉडक्शन कंपनी सुरू करून तिने सामाजिक भान राखणारी सामग्री निर्माण करण्यास सुरुवात केली. दीया मिर्झा ही केवळ अभिनेत्री नाही, तर एक संवेदनशील, जागरूक आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त तिला खूप खूप शुभेच्छा!