Dhurandhar 2 : १९ मार्चला धुरंधर २ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागाला मिळालेल्या उंदड प्रतिसादामुळे दुसऱ्या भागाची मोठी उत्सुकता चाहत्यांमध्ये बघायला मिळते. या चित्रपटाची क्रेझ चाहत्यांमध्ये इतकी आहे की, तिकीट बुकिंगचे दर वाढलेले असतानाही अनेक ठिकाणचे शोज हाऊसफुल्ल होत आहेत. चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी अजून काही दिवस बाकी असतानाच हे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे १८ मार्चच्या संध्याकाळी काही चित्रपटगृहात धुरंधर २ चे पेड प्रिव्ह्यू शो ठेवण्यात आले आहेत. या तिकिट बुकिंगलाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. देशातील अनेक मल्टिप्लेक्समध्ये प्रिव्ह्यू शोसाठी तिकिटांचे दर सामान्यपेक्षा खूप जास्त ठेवण्यात आले आहेत. मेट्रो शहरांमध्ये साध्या तिकिटांचे दर ६०० ते ९०० दरम्यान आहेत. आयमॅक्स शोसाठी काही ठिकाणी तिकिटांचे दर १००० पेक्षाही जास्त आहेत. लक्झरी रेक्लायनर सीटसाठी तर प्रेक्षकांना मोठी किंमत मोजावी लागत आहे. मुंबईतील बोरिवली येथील आयनॅाक्स मेगाप्लेक्समध्ये रेक्लायनर सीटची किंमत तब्बल ३१०० आहे. तर दिल्लीतल्या पीव्हीआर सिलेक्ट सिटी वॉकमध्ये ही किंमत २४०० पर्यंत आहे. तिकीट दरांत वाढ झालेली असतानाही शोज सोल्ड आऊट होत आहेत. धुरंधर २ ने अॅडव्हान्स बुकिंगमध्येच १५ कोटींची कमाई केली असून, चित्रपटाची ३ लाख तिकीटे विकली गेली आहेत. यामुळे हा चित्रपट बॉलीवूडमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या प्रीमियरपैकी एक ठरला आहे अभिनेता रणवीर सिंह पुन्हा एकदा भारतीय गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात आर. माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, डॅनिश पंडोर, राकेश बेदी आणि सारा अर्जुन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘धुरंधर’च्या पहिल्या भागाला प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला होता. या चित्रपटाने जगभरात १३०० कोटींची कमाई करत इतिहास रचला. आता धुरंधर २ कडे सर्वांचे लक्ष असून बॅाक्स अॅाफिसवर कसा प्रतिसाद चित्रपटाला चाहते देतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे. हेही वाचा : Aneet Padda : मधुबालाच्या बायोपिकमध्ये ‘सैयारा’ फेम अभिनेत्री? इंडस्ट्री सोर्सकडून खुलासा