Dhurandhar 2 Collection: बॉलिवूडमध्ये सध्या धुरंधर २ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. अभिनेता रणवीर सिंह याच्या प्रमुख भूमिकेतील या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. रिलीज झाल्यापासूनच या चित्रपटाने कमाईचे नवे विक्रम प्रस्थापित करण्यास सुरुवात केली असून, केवळ सात दिवसांतच ६०० कोटींचा टप्पा पार केला आहे. चित्रपटाने पेड प्रीव्ह्यूमधूनच ४३ कोटी रुपयांची दमदार कमाई करत शानदार सुरुवात केली. त्यानंतर ओपनिंग डे ला तब्बल १०२.५५ कोटींची कमाई करत ऐतिहासिक विक्रम केला. दुसऱ्या दिवशी ८०.७२ कोटी, तिसऱ्या दिवशी ११३ कोटी आणि चौथ्या दिवशी ११४ कोटींची कमाई झाली. या सलग मोठ्या आकड्यांमुळे चित्रपटाने सुरुवातीपासूनच बॉक्स ऑफिसवर मजबूत पकड निर्माण केली. वीकडेजमध्येही चित्रपटाची कमाई कमी झाली नाही. पाचव्या दिवशी ६५ कोटी आणि सहाव्या दिवशी ५६.६० कोटींचा गल्ला जमवल्यानंतर सातव्या दिवशी म्हणजे बुधवारी चित्रपटाने ४७.७० कोटी रुपये कमावले. त्यामुळे सात दिवसांत एकूण नेट कलेक्शन ६२३.४२ कोटी रुपयांवर पोहोचले आहे, तर भारतातील ग्रॉस कलेक्शन ७४४.५८ कोटी रुपये झाले आहे. Dhurandhar 2 या जबरदस्त कामगिरीमुळे ‘धुरंधर २’ने छावा या चित्रपटाचा ६०१ कोटींचा कलेक्शन रेकॉर्डही मागे टाकला आहे. इतकंच नाही तर पठाण, गदर २ आणि एनिमल यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या लाइफटाइम कलेक्शनलाही या चित्रपटाने मागे टाकल्याचं सांगितलं जात आहे. आता या चित्रपटाचे पुढचे लक्ष्य स्त्री २ या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडण्याचे आहे. ‘धुरंधर २’ हा एक स्पाय थ्रिलर चित्रपट असून त्याचे दिग्दर्शन आदित्य धर यांनी केले आहे. १९ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अॅक्शन, कथा आणि स्टारकास्ट यांचा उत्तम मिलाफ असल्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. चित्रपटात रणवीर सिंह यांच्यासोबत संजय दत्त, आर माधवन, अर्जुन रामपाल, राकेश बेदी आणि सारा अर्जुन यांसारख्या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. सर्व कलाकारांच्या अभिनयामुळे चित्रपटाला अधिक बळ मिळाले आहे. सध्या चित्रपटाची कमाई पाहता, ‘धुरंधर २’ पुढील काही दिवसांत आणखी नवे विक्रम प्रस्थापित करेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. जर हीच गती कायम राहिली, तर हा चित्रपट रणवीर सिंह यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा हिट चित्रपट ठरू शकतो.