खडकवासला परिसरातील एका रिसॉर्टमध्ये नियम धाब्यावर बसवून तरुण-तरुणीची धूलिवंदन पार्टी

खडकवासला(प्रतिनिधी) – सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक गावच्या हद्दीत असलेल्या एका रिसॉर्टमध्ये हजारांपेक्षा जास्त तरुण-तरुणींचा मद्यधुंद होऊन एकत्रित धुलिवंदन इव्हेंट आयोजित करण्यात आलेला आहे. हॉटेल समोर मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पाचशे ते आठशे मीटर पर्यंत या इव्हेंटमध्ये सहभागी असलेल्या तरुण-तरुणींच्या दुचाकी व चारचाकी वाहने वेड्यावाकड्या उभ्या करण्यात आल्या आहेत. यामुळे सामान्य नागरिकांना व इतर पर्यटकांना ये-जा करताना वाहतूक कोडींला सामोरे जावे लागले. पोलिस कर्मचाऱ्यांचा कमतरतेमुळेचा गैर फायदा घेत असल्याचे दिसून आले.
एका बाजूला खडकवासला धरणाचे प्रदूषण राखण्यासाठी विविध सामाजिक संघटनांचे स्वयंसेवक भर उन्हात खडा पहारा देत आहेत तर दुसरीकडे धरणाच्या अगदी पाण्याला लागून हजारो मद्यधुंद तरुण तरुणी हॉटेलमध्ये डिजेच्या तालावर बिनधास्तपणे रंग खेळत आहेत. ज्या ठिकाणी हा इव्हेंट आयोजित करण्यात आलेला आहे. या इव्हेंट मधील लाखो लिटर रंग मिश्रीत पाणी हे सरळ धरणाच्या पाण्यात मिसळण्याची शक्यता आहे.
“कार्यक्रमासाठी परवानगी घेण्यात आलेली आहे. कार्यक्रमासाठी किती लोक जमतील याबाबत काही माहिती नाही. रस्त्यावर लावण्यात आलेल्या वाहनांवर कारवाई केली आहे.”
-सदाशिव शेलार (पोलीस निरीक्षक, हवेली पोलीस ठाणे,पुणे ग्रामीण)
धरण परिसरात असे असंख्य हॉटेल,रिसॉर्ट आहेत. अशा हॉटेल, रिसॉर्टला प्रशासन परवानगी देत असताना खालील बाबीचा विचार करत आहे का? हा प्रश्न निर्माण होत आहे. रस्तावर वाहतूक कोंडी, पाणी प्रदूषण, कर्कश्श आवाज, ध्वनी प्रदुषण त्याच प्रमाणे वायू प्रदूषण या बाबी प्रशासन तपासत का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.








