Farmers News : धुळ्यात पावसाची दडी; 31 जुलैनंतर पाऊस गायब, शेतकऱ्यांची चिंता वाढली
Farmers News : धुळे जिल्ह्यात ३१ जुलैनंतर पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ९५ टक्के खरीप पेरण्या पूर्ण असून पिकांवर पाण्याचा ताण वाढला आहे.

Farmers News : धुळे जिल्ह्यात ३१ जुलैनंतर पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिकांबाबत शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात तब्बल ९५ टक्के खरीप पेरण्या पूर्ण झाल्या असून, उपलब्ध पाण्यावर पिके जगविण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांकडून सुरू आहे. मात्र, पुढील काही दिवसांत पाऊस न झाल्यास उभी पिके करपण्याची भीती व्यक्त होत आहे.
धुळे जिल्ह्यात कपाशी, मका आणि हरभरा या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. हंगामाच्या सुरुवातीला पावसाने साथ दिल्याने खरीप पिकांना चांगली सुरुवात झाली होती. मात्र, आता पावसाने पाठ फिरवल्याने पिकांवर पाण्याचा ताण वाढला आहे.
पावसाचा खंड आणखी वाढल्यास पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. विशेषतः कपाशी पिकावर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांचे लक्ष आता आकाशाकडे लागले आहे.
वेळेत पाऊस न झाल्यास खरीप पिकांचे नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेऊन शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत तसेच नुकसानभरपाईची तरतूद करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.





