Dhruv Rathee: “इतके पैसे पुरेसे नाहीत का?”… ध्रुव राठीचा शाहरुख खानला प्रश्न, पान मसाल्याच्या जाहिरातीवरून टीका

Dhruv Rathee: बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आज जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक आहे. त्यांची एकूण संपत्ती सुमारे ₹12,400 कोटी रुपये (1.4 अब्ज डॉलर्स) इतकी आहे. मात्र, या अफाट संपत्तीनंतरही ते अजूनही पान मसाल्याच्या जाहिराती करत असल्याने यूट्यूबर ध्रुव राठी यांनी त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
ध्रुव राठीचा प्रश्न
ध्रुव राठी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत विचारले की,“शाहरुख खान आता अब्जाधीश झाले आहेत. त्यांच्याकडे एवढी संपत्ती आहे की, ती कल्पनेपलीकडची आहे. मग 100-200 कोटी रुपयांसाठी पान मसाला सारख्या हानिकारक उत्पादनाची जाहिरात करण्याची गरज का?”
त्यांनी सांगितलं की, जर शाहरुख यांची इतकी संपत्ती फक्त बँकेत ठेवली तरी 7% व्याजदराने त्यांना वर्षाला 870 कोटी रुपये फक्त व्याजात मिळतील. कर वजा केल्यावरही त्यांच्याकडे 500 कोटी रुपये उरतील. “इतका पैसा असूनही अजून जाहिरात का?”
राठी पुढे म्हणाले,
“या पैशाने ते रोज जगातील सर्वात महागड्या विमानाच्या फर्स्ट क्लास सीटने प्रवास केला तरी वर्षाला फक्त 35 कोटी खर्च होईल.
जगातील सर्वात महागड्या हॉटेलमध्ये रोज राहिले तरी 35-36 कोटींपेक्षा जास्त खर्च होणार नाही.”
ते पुढे म्हणाले की,
“एक प्रायव्हेट जेट विकत घेऊन दरवर्षी त्याच्या देखभालीवर 200 कोटी खर्च झाले तरी, जगभरात लक्झरी प्रॉपर्टी घेतली तरी त्यांचा खर्च वर्षभरात 400 कोटींपर्यंतच जाईल. म्हणजे इतके श्रीमंत झाल्यावर पैसे खर्च करणेही अवघड होते.”
ध्रुव राठीचा थेट प्रश्न,
“शाहरुख खान, इतके पैसे पुरेसे नाहीत का?
जर पुरेसे असतील, तर अजूनही पान मसाल्यासारख्या हानिकारक वस्तूंची जाहिरात का करता?
2014 मध्ये तुम्हाला अशा जाहिरातींसाठी वर्षाला 10 ते 20 कोटी मिळत होते.
धरूया, आता 2025 मध्ये ती रक्कम 100 ते 200 कोटी झाली असेल.
पण या अतिरिक्त पैशाची खरंच गरज आहे का?
आणि जर देशातील सर्वात मोठा अभिनेता अशी जाहिरात करणे थांबवेल, तर समाजावर किती चांगला परिणाम होईल हेही विचार करा.”
सध्या शाहरुख खान कोणत्या चित्रपटात व्यस्त आहेत?
सध्या शाहरुख खान ‘किंग’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहेत. यात सुहाना खान, दीपिका पदुकोण, अभिषेक बच्चन आणि अर्शद वारसी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
ध्रुव राठी यांच्या या प्रश्नामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. अनेकांनी त्यांना समर्थन दिलं असून, काहींनी शाहरुख खानच्या निवडीचं समर्थन केलं आहे. मात्र, या प्रकरणाने “सेलेब्रिटी जबाबदारी” या विषयावर नवी चर्चा पेटली आहे.





