IND vs WI : सिराजच्या वेगवान चेंडूवर ध्रुव जुरेलने घेतला नेत्रदिपक झेल, VIDEO होतोय तुफान व्हायरल

Dhruv Jurel’s stunning catch : भारत आणि वेस्टइंडीज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला आज अहमदाबादमध्ये सुरुवात झाली. वेस्टइंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, परंतु हा निर्णय त्यांच्यासाठी घातक ठरला. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर वेस्ट इंडिजचा डाव अवघ्या 44.1 षटकांत 162 धावांत आटोपला. मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांच्या तुफानी गोलंदाजीने पाहुण्या संघाची फलंदाजी अक्षरशः उद्ध्वस्त केली, तर युवा यष्टीरक्षक ध्रुव जुरेलने आपल्या चपळाईने सर्वांचे लक्ष वेधले. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय.
ध्रुव जुरेलच्या झेलने वेधलं लक्ष –
ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत संधी मिळालेल्या ध्रुव जुरेलने यष्टीरक्षणात कमाल केली. मोहम्मद सिराजच्या चौथ्या षटकातील पाचव्या चेंडूवर तेजनारायण चंद्रपॉलने फाईन लेगच्या दिशेने शॉट मारला, पण चेंडू बॅटची कडा घेत यष्टीरक्षक ध्रुव जुरेलकडे गेला. जुरेलने उजव्या दिशेने डाईव्ह मारून अप्रतिम झेल घेतला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
India got upgraded wicketkeeper & batsman over Rishabh Pant. Dhruv Jurel clears him by miles ❤️🔥pic.twitter.com/tTX0R5oETC
— JJ (@JJhuMaybe) October 2, 2025
त्याने हवेत उडी मारून घेतलेले शानदार झेल आणि चपळ क्षेत्ररक्षणाने भारतीय गोलंदाजांचा आत्मविश्वास वाढला. जुरेलने मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेत आपल्या करिअरसाठी महत्त्वपूर्ण पाऊल टाकले. त्याच्या या कामगिरीमुळे तो भविष्यातील मोठा खेळाडू ठरू शकतो, अशी चर्चा सुरू झाली आहे.
वेस्ट इंडिजची फलंदाजी ढासळली –
वेस्टइंडीजच्या फलंदाजांना भारतीय गेंदबाजांसमोर टिकाव लागला नाही. जस्टिन ग्रीव्हसने सर्वाधिक 32 धावा केल्या, तर शाई होपने 26 आणि कर्णधार रॉस्टन चेजने 24 धावांचे योगदान दिले. याशिवाय एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. भारतीय गेंदबाजांच्या अचूक लाइन-लेंथ आणि क्षेत्ररक्षकांच्या चपळाईमुळे वेस्टइंडीजला मोठा डाव उभारण्याची संधीच मिळाली नाही.
हेही वाचा – IND vs WI : जसप्रीत बुमराहने WTC मध्ये रचला इतिहास, भारतात असा करणारा पहिलाच वेगवान गोलंदाज
सिराज-बुमराह यांचा कहर –
मोहम्मद सिराजने 14 षटकांत 40 धावांत 4 विकेट्स घेत वेस्ट इंडिजच्या फलंदाजीला सुरंग लावला. त्याने टी चंद्रपॉल, एलिक अल्थानाजे, ब्रँडन किंग आणि रॉस्टन चेज यांना बाद केले. जसप्रीत बुमराहनेही 14 षटकांत 42 धावांत 3 विकेट्स घेतल्या. त्याने जॉन कॅम्पबेल, जस्टिन ग्रीव्हस आणि जोहान लेन यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. फिरकीपटू कुलदीप यादवने 6.1 षटकांत 25 धावांत 2 विकेट्स घेत वेस्ट इंडिजच्या डावाचा शेवट केला.
हेही वाचा – IND vs WI : भारताविरुद्ध पहिल्या डावात वेस्ट इंडिजची लज्जास्पद ‘शरणागती’, प्रथमच घडला असा कारनामा!
भारतीय गोलंदाजांचे पहिल्या डावात वर्चस्व –
भारतीय गोलंदाजांनी पहिल्या डावात आपले वर्चस्व राखले. सिराज आणि बुमराह यांच्या वेगवान माऱ्यासह कुलदीपच्या फिरकीने वेस्ट इंडिजला गुंडाळले. ध्रुव जुरेलच्या अप्रतिम यष्टीरक्षणाने या कामगिरीला आणखी चमक आली. आता सर्वांचे लक्ष भारतीय फलंदाजांवर आहे. ते किती धावा करतात आणि किती आघाडी मिळवतात, याकडे क्रिकेटप्रेमींची नजर लागली आहे.





