धोनी-जडेजाचे प्रयत्न व्यर्थ ! अटीतटीच्या लढतीत राजस्थानची चेन्नईवर अवघ्या ३ धावांनी मात

चेन्नई – कर्णधार महेंद्रसिंह धोनी व रवींद्र जडेजा यांनी अखेरच्या चेंडूपर्यंत दिलेली लढत अपुरी ठरली व राजस्थान रॉयल्सने बुधवारी आयपीएल स्पर्धे तील सामन्यात चेन्नई सुपर किंग्जवर अवघ्या ३ धावांनी रेमहर्षक विजय मिळवला. या विजयात राजस्थानचे फिरकी गोलंदाज रवीचंद्रन अश्विन व यजुवेंद्र चहल यांनी अफलातून गोलंदाजी करत चेन्नईच्या फलंदाजीचे कंबरडेच मोडले.
राजस्थानने विजयासाठी दिलेल्या १७६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात खराब झाली. भरात असलेला फलंदाज ऋतुराज गायकवाड संघाच्या १० धावा असताना १ चौकार फटकावत ८ धावांवर बाद झाला. त्यानंतर डेव्हन कॉनवे व अजिंक्य रहाणे यांनी डाव सावरताना संघाचे अर्धशतक फलकावर लावले. रहाणे या सामन्यातही आक्रमकच खेळला. मात्र, तो ३१ धावांवर बाद झाला.
या खेळीत त्याने १९ चेंडूत २ चौकार व १ षटकार फटकावला. फलंदाजीत बढती देण्यात आलेल्या शिवम दुबेने पुन्हा एकदा निराशा केली. यावेळी एका बाजूने कॉनवेने बाजू सांभाळून ठेवली होती. त्याने खराब चेंडूवर आक्रमक फटकेबाजी करताना एकेरी व दुहेरी धावांवर भर देत धावफलक हलता ठेवला. त्याने संघाचे शतक फलकावर लावले तसेच आपले अर्धशतकही पूर्ण केले. मात्र, मोईन अलीने अनावश्यक पद्धतीने फटका मारत आपली विकेट गमावली. यावेळी कॉनवेला साथ देण्यासाठी अम्बाती रायडू खेळपट्टीवर आला व केवळ हजेरी लावून यजुवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर बादही झाला. यावेळी चेन्नईची स्थिती ५ बाद १०३ अशी बिकट बनली होती.
चहलने याच षटकातील अखेरच्या चेंडूवर स्थिरावलेल्या कॉनवेला बाद करत राजस्थानच्या मार्गातील मोठा अडसर दूर केला. त्याने ५० धावांच्या खेळीत ३८ चेंडूत ६ चौकार फटकावले. आता खेळपट्टीवर कर्णधार महेंद्रसिंह धोनी व रवींद्र जडेजा ही जोडी एकत्र आली. ६ बाद ११३ या स्थितीनंतर धोनी व जडेजा यांनी विजयासाठी निकराचे प्रयत्न केले. अखेरच्या २ षटकांत ४० धावांची गरज होती. ९ व्या षटकात जडेजाने दोन षटकार व एक चौकारासह एकूण १९ धावा काढल्या.आता अखेरच्या षटकांत २१ धावांची आवश्यकता होती. संदीप शर्माने दोन चेंडू वाइड टाकले. त्यानंतर एक चेंडू निर्धाव गेला. दुसऱ्या व तिसऱ्या चेंडूवर धोनीने षटकार फटकावला. यावेळी ३ चेंडूत सात धावंची गरज होती. चौथ्या चेंडूवर धोनीने एकेरी धाव घेतली तर पाचव्या चेंडूवर जडेजानेही एकेरी
धाव घेतली. अखेरच्या चेंडूवर ५ धावांची गरज असताना संदीप शर्माने अचूक चेंडू टाकला व धोनीला एका धावेवरच समाधान मानावे लागले आणि राजस्थानने हा रोमहर्षक सामना अवघ्या ३ धावांनी जिंकला.
धोनी १७ चेंडूत १ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ३२ तर जडेजा १५ चेंडूत १ चौकार व २ षटकारांसह २५ धावांवर नाबाद राहिले. राजस्थानकडून रवीचंद्रन अश्विन व यजुवेंद्र चहल यांनी प्रत्येकी २ गडी बाद करत चेन्नईच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. अॅडम झम्पा व संदीप शर्मा यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.
तत्पूर्वी, रवींद्र जडेजा, मोईन अली, तुषार देशपांडे व आकाश सिंग यांनी केलेल्या अचुक गोलंदाजीमुळे चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्सला १७५ धावांवर रोखले.चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने नाणेफेक जिंकत राजस्थानला पहिल्यांदा फलंदाजी दिली. राजस्थानच्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर यशस्वी जयस्वाल १० धावांवर परतला. त्यानंतर जोस बटलरला साथ देत पडीक्कलने संघाचे अर्धशतक फलकावर लावले.
पडीक्कल ३८ धावांवर बाद झाला. त्याने २६ चेंडूत ५ चौकार फटकावले. कर्णधार संजू सॅमसनचा जडेजाने त्याच षटकात त्रिफळा उडवला. दरम्यान बटलरने आपले अर्धशतक पूर्ण केले.त्याला रवीचंद्रन अश्विनने सुरेख साथ दिली. या जोडीने संघाचे शतक फलकावर लावले. अश्विनही ३० धावांवर परतला. त्याने या खेळीत २२ चेंडूंचा सामना करताना १ चौकार व २ षटकार फटकावले. अर्धशतकवीर बटलरही लगेचच परतला. त्याने ५२ धावांची खेळी करताना ३६ चेंडूत १ चौकार व ३ षटकार मारले. बटलर व पडीक्कल खेळत असताना द्विशतकी धावसंख्या गाठेल ही अपेक्षा फोल ठरली.
यावेळी भरात असलेला हेटमायर खेळपट्टीवर आला व त्याने लगेचच आपली आक्रमकता सिद्धही केली. त्याच्या जोडीला फलंदाजीला आलेले ध्रुव जुरेल (४), जेसन होल्डर (0) यांनी साफ निराशा केली. हेटमायर मात्र संघाच्या धावसंख्येत एकाबाजूने भर घालत होता. अखेरच्या चेंडूवर दुहेरी धाव घेण्याच्या प्रयत्नात अॅडम झम्पा (१) धावबाद झाला व राजस्थानचा डाव संपूष्टात आला.हेटमायरने नाबाद ३० धावांची खेळी करताना १८ चेंडूत २ चौकार व २ षटकार फटकावले. चेन्नईकडून रवींद्र जडेजा, तुषार देशपांडे व आकाश सिंग यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. मोईन अलीने १ बळी घेतला. राजस्थानचा डाव २० षटकांत ८ बाद १७५ असा रोखला गेला.
संक्षिप्त धावफलक
राजस्थान रॉयल्स २० षटकांत ८ बाद १७५ धावा. (जोस बटलर ५२, देवदत्त पडीक्वल ३८, रवीचंद्रन अश्विन ३०, शेमरन हेटमायर नाबाद ३०, रवींद्र जडेजा २-२१, तुषार देशपांडे २-३७, आकाश सिंग २-४०, मोईन अली १-२१).
चेन्नई सुपर किंग्ज २० षटकांत ६ बाद १७२ धावा. (डेव्हन कॉनवे ५०, अजिंक्य रहाणे ३१, महेंद्रसिंह धोनी नाबाद ३२, रवींद्र जडेजा नाबाद २५, रवीचंद्रन अश्विन २-२५, यजुवेंद्र चहल २-२७, संदीप शर्मा १-३०, अॅडम झम्पा १-४३).





