DHFL Scam: 34,000 कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीप्रकरणी CBIची मोठी कारवाई; धीरज वाधवन यांना अटक

DHFL Scam: केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने DHFL (दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड) चे माजी संचालक धीरज वाधवन यांना 34,000 कोटी रुपयांच्या बँक फसवणूक प्रकरणात अटक केली आहे. अधिकाऱ्यांनी मंगळवारी ही माहिती दिली.
वाधवान यांना सोमवारी संध्याकाळी मुंबईतून ताब्यात घेण्यात आले आणि मंगळवारी दिल्लीतील विशेष न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
अधिका-यांनी सांगितले की, सीबीआयने 2022 मध्ये या प्रकरणात त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. त्यांनी सांगितले की, ‘येस बँक’ भ्रष्टाचार प्रकरणात वाधवन यांना यापूर्वी एजन्सीने अटक केली होती आणि ते जामिनावर होते.
अधिकारी म्हणाले की, सीबीआयने 17 बँकांच्या संघाने 34,000 कोटी रुपयांच्या कथित फसवणुकीच्या संदर्भात डीएचएफएल घोटाळा प्रकरण नोंदवले आहे. देशातील बँकिंग कर्ज फसवणुकीचे हे सर्वात मोठे प्रकरण आहे.
युनियन बँक ऑफ इंडियाच्या तक्रारीवरून नोंदवण्यात आलेल्या एफआयआरमध्ये वाधवान बंधूंनी (कपिल वाधवन आणि धीरज वाधवन, जे कंपनीचे संचालक होते) इतर आरोपींसह युनियन बॅंकेच्या नेतृत्वाखालील 17 बँकांच्या पैशांचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की, या लोकांनी गुन्हेगारी कट रचला आणि 42,871.42 कोटी रुपयांचे कर्ज घेतले, सीबीआयने आरोपपत्रात लिहिले आहे की, वाधवान बंधूंनी डीएचएफएलच्या पुस्तकांमध्ये छेडछाड केली आहे.





