फलटण, संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या जयंतीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमाण (पंजाब) या सुमारे पाच हजार किलोमीटर लांब पल्याच्या व ३१ दिवस चालणाऱ्या रथयात्रा व सायकलवारीचे उद्या रविवारी येथे आगमन होत आहे. सायकलवारीच्या स्वागतासाठी फलटण सज्ज झाले आहे. भागवत धर्म प्रसारक मंडळ, पालखी सोहळा पत्रकार संघ, श्री नामदेव दरबार कमिटी व समस्त नामदेव शिंपी समाजाच्यावतीने संत नामदेव महाराज यांची ७५५ वी जयंती, श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा ७२९ वा संजीवन समाधी सोहळा व शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक देव यांच्या ५५६ व्या प्रकाश पर्वानिमित्त यंदा रविवार दि. २ नोव्हेंबर ते दि. ३ डिसेंबर दरम्यान ३१ दिवसांची रथयात्रा व सायकलवारी आयोजित केली आहे. वारीचे हे चौथे वर्ष असून ही वारी महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश या आठ राज्यांतून प्रवास करणार आहे. या वारीत १५० सायकलस्वार व ५० भजनी मंडळी सहभागी झाली आहेत. देशातील ही पहिली अध्यात्मिक सायकलवारी असल्याचे भागवत धर्म प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे यांनी सांगितले. संत नामदेव महाराज यांच्या पादुकांची विधीवत पूजा जन्मस्थान पंढरपूर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या दि. २ नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजता करण्यात येणार असून सकाळी ६ वाजता पंढरपूर येथे रथयात्रा व सायकलवारीचा शुभारंभ भागवत धर्माची पताका फडकावून उपमुख्यमंत्री शिंदे करणार आहेत. अध्यक्षस्थानी ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, संत नामदेव महाराजांचे १६ वे वंशज श्री ज्ञानेश्वर महाराज नामदास, धर्मवीर अध्यात्मिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय महाराज भोसले, आ. अभिजित पाटील, आ. समाधान अवताडे, आ. राजू खरे, माजी आ. प्रशांत परिचारक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सकाळी ८ वाजता वेळापूर येथे या सायकलवारीचे स्वागत आ. उत्तमराव जानकर करतील. दुपारी १२ वाजता सदाशिवनगर येथे वारीचे स्वागत खासदार धैर्यशील मोहिते पाटील करणार आहेत. नातेपुते, बरडमार्गे ही रथयात्रा व सायकलवारी पहिल्या फलटण मुक्कामी पोहोचेल. संत नामदेव शिंपी समाज विठ्ठल मंदिर ट्रस्ट व स्थानिक पंढरपूर- घुमान यात्रा संयोजन समितीच्यावतीने सायकलवारीच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली असून क्रांतीसिंह नाना पाटील चौक ते श्री विठ्ठल मंदिर अशी भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. फलटणमध्ये विधान परिषदेचे माजी सभापती, माजी खासदार, आमदार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्थेचे पदाधिकारी आदी मान्यवर सायकलवारीचे स्वागत करणार आहेत. यावेळी पालखी सोहळा पत्रकार संघाचे अध्यक्ष शंकर टेमघरे, उपाध्यक्ष सुभाष भांबुरे, सचिव ॲड. विलास काटे, सहसचिव राजेंद्रकृष्ण कापसे, खजिनदार मनोज मांढरे, विश्वस्त राजेंद्र मारणे, राज्य समन्वयक सरबजितसिंग बावा (पंजाब), गणेश उंडाळे (महाराष्ट्र), खेमराज नामा, सीताराम टाक (राजस्थान), मुलचंद परमार (गुजरात), ॲड. हरपालसिंग (हरियाणा), महेंद्रसिंग लड्डा (दिल्ली), किशनसिंह राजपूत (उत्तर प्रदेश) व अरुण नामदेव (मध्य प्रदेश) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. वारीचा दि. २५ रोजी समारोप महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा व पंजाब राज्यांचा दौरा करीत ही रथयात्रा व सायकलवारी मंगळवर दि. २५ नोव्हेंबर रोजी श्री क्षेत्र घुमाण येथे पोहोचेल. परंपरेप्रमाणे श्री नामदेव दरबार कमिटी व घुमाण ग्रामस्थांच्यावतीने वारीचे स्वागत केले जाईल. बुधवार दि. २६ रोजी श्री क्षेत्र घुमाण येथे खासदार श्रीकांत शिंदे व खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते व संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, धर्मवीर अध्यात्मिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत सायकल रायडर्सचा सन्मान व वारीचा समारोप करण्यात येणार आहे.