पुणे | स्टेशन मास्तरांचे धरणे आंदोलन

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – दिवसरात्र वेगवेगळ्या संकटावर मात करत स्टेशन मास्तर रेल्वे स्टेशनवर काम करत असतात. रात्रपाळी करून देखील भत्ता मिळत नाही, सुरक्षा भत्ता दिला जात नाही. लढल्या शिवाय कोणती गोष्ट मिळत नाही.
त्यामुळे आगामी काळात देखील आपल्या मागण्या जोरदारपणे मांडव्या लागतील. जे आपल्या हक्काचे आहे ते हक्काने मिळवून घेणार असल्याचा निर्धार आॅल इंडिया स्टेशन मास्टर असोसिएशनचे प्रमुख मार्गदर्शक राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय चंद्रात्रे यांनी व्यक्त केला.
रेल्वेच्या देशभरातील स्टेशन मास्तरांचा पॉवर डे सोमवार (दि.१२) रोजी देशभरातील ६८ रेल्वेच्या विभागीय कार्यालयावर होत आहे. रेल्वे मंत्रालयाकडे प्रलंबित असलेल्या विविध मागण्या संदर्भात स्टेशन मास्तरांनी पुणे स्टेशन विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
या आंदोलनात रेल्वेचे सर्व विभागातील स्टेशनमास्तर सहभागी झाले. यावेळी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. तर असोसिएशनचे सेक्रेटरी जनरल डी. एस. अरोरा, अजय सिन्हा, पुणे विभागीय अध्यक्ष कृष्ण मुरारी, पुरुषोत्तम सिंह, अमित कुमार, स्टेशन मास्तर प्रल्हाद कुमार, दिनेश कांबळे सहभागी झाले होते.
स्टेशन मास्तर राकेश कुमार म्हणाले, गाड्या वाढत आहे. परंतु, स्टेशन मास्तर संख्या वाढत नाही. प्रत्येक स्टेशनवर दोन तरी किमान स्टेशन मास्तर असावे. स्टेशन मास्तर यांना मारहाणीच्या घटना घडतात. त्यावर उपाययोजना होणे आवश्यक आहे.
संघटना एकत्रित असणे गरजेचे आहे. कामाचा भार वाढून देखील भत्ते वाढत नाही. आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याने अनेकजण मुदतपूर्व निवृत्ती घेत आहे.
स्टेशन मास्तरांच्या मागण्या काय ?
ट्रेन आॅपरेशनमध्ये सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी स्टेशन मास्तर कॅडरमध्ये रिक्त जागा त्वरित भरण्यात याव्यात. दुहेरी मार्गावरील सर्व स्थानकावर अतिरिक्त स्टेशन मास्तरांची नियुक्ती करण्यात यावी.
अंतर विभागीय विनंती बदली प्रक्रियेत पारदर्शकता असावी. लोणावळा ते दौंड विभागात सहा तासाच्या रोस्टरसाठी जॉब अनालिसिस करणे आवश्यक आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे विभागातील सर्व मोठ्या स्थानकावर सुपरवायझर स्टेशन मास्तरची नियुक्ती करण्यात यावी. स्टेशन मास्तरांच्या बदल्या करताना त्यांचे कौटुंबिक जीवन विस्कळीत होणार नाही याची काळजी घ्यावी.
सर्व स्थानकावर आर ओ वॉटर पुरिफायरची तरतूद करावी. सर्व स्थानकावर विश्रांती कक्ष सुविधाची तरतूद करावी. महिला स्टेशन मास्तरसाठी चेंजिंग रूमची उभारणी करण्यात यावी.





