Dharmendra : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती खालावली; मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र (वय ८९) यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीत अचानक खालावल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये काळजीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, कुटुंबातील जवळच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे की, धर्मेंद्र यांच्या आरोग्यात कोणतीही गंभीर समस्या नाही. वयाचा विचार करता खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना नियमित तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.धर्मेंद्र यांच्या निकटवर्तीयाने माध्यमांशी बोलताना सांगितले, “काळजी करण्याची कोणतीही गरज नाही. ही फक्त नियमित तपासणी आहे. ते लवकरच घरी परततील.
सध्या धर्मेंद्र आपल्या आगामी चित्रपट ‘इक्कीस’ चे प्रमोशन करताना दिसत होते. या चित्रपटात ते अभिनेता अगस्त्य नंदाचे आजोबा साकारत आहेत. हा चित्रपट अरुण क्षेत्रपाल यांच्या आयुष्यावर आधारित असून दिग्दर्शक श्रीराम राघवन यांच्या नेतृत्वाखाली बनवला जात आहे. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान धर्मेंद्र उत्साहाने दिसत होते, पण आता रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी समोर आली.
७० आणि ८० च्या दशकात बॉलिवूडवर राज्य करणारे धर्मेंद्र आजही चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. ‘शोले’, ‘चुपके चुपके’, ‘यमला पगला दीवाना’ सारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांचे शिलेदार म्हणून त्यांची ओळख आहे. चाहत्यांनी त्यांना ‘ही-मॅन’ असे प्रेमळ नाव दिले आहे. सोशल मीडियावरही ते अत्यंत सक्रिय असतात आणि आपल्या चाहत्यांशी थेट संवाद साधत राहतात. चाहत्यांकडून सध्या धर्मेंद्र यांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. कुटुंबाच्या आश्वासनानंतर चाहत्यांना दिलासा मिळाला असून, लवकरच धर्मेंद्र पुन्हा सक्रिय होणार असल्याची अपेक्षा आहे.





