आनंद दिघेंच्या मृत्यूचं गुढ उकलणार? बहुप्रतिक्षित ‘धर्मवीर-2’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज

मुंबई : बहुप्रतिक्षित धर्मवीर- 2 चा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. मागील अनेक दिवसांपासून या सिनेमाची जोरदार चर्चा सुरु आहे. प्रवीण तरडे दिग्दर्शित या सिनेमात प्रसाद ओक आणि क्षितिज दाते हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. प्रसाद ओकने आनंद दिघे यांची तर क्षितिज दातेने एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारली आहे.
काय आहे ट्रेलरमध्ये?
या ट्रेलरमध्ये काही संवादांनी विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाचं कारण, आनंद दिघे यांचा मृत्यू कसा झाला असे अनेक प्रश्न उपस्थित करणारे संवाद यामध्ये आहेत. आनंद दिघे हे म्हणतात की,कुणाशीतरी आघाडी करुन तुम्ही विकलात तो भगवा रंग. हा संवाद सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेत आहे. तसेच एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारणाऱ्या क्षितिज दातेच्याही एका संवादाने लक्ष वेधून घेतलं आहे, 20 वर्षांपूर्वी याच ठाण्यात एक दाढीवाला बेसावध होता, पण जाताना दुसऱ्या दाढीवाल्याला सावध करुन गेला आहे.
कधी रिलीज होणार चित्रपट?
धर्मवीर-2 सिनेमा हा सिनेमा हिंदीतही प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे फक्त महाराष्ट्रातच नाही,तर संपूर्ण देशभरात हा सिनेमा प्रदर्शित केला जाईल. धर्मवीर या सिनेमानंतर धर्मवीर 2 सिनेमाची प्रेक्षकांना बरीच उत्सुकता होती. येत्या 9 ऑगस्ट रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे आता या सिनेमात प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे.





