पुणे | शिक्षक महाभोंडला स्पर्धेत धारेश्वर विद्यालय प्रथम

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महिलांवरील वाढते अत्याचार… स्त्री भ्रूणहत्या… स्त्री शक्तीचे महत्त्व आणि महात्म्य भोंडल्याच्या वेळी झालेल्या खेळांतून शिक्षकांनी उलगडले. भोंडल्याची पारंपरिक गाणी आणि खेळ श्री महालक्ष्मी मंदिराच्या सभामंडपात सादर करण्यात आले.
शिक्षक पारंपरिक वेशात स्पर्धेत सहभागी झाले होते. धारेश्वर विद्यालयाच्या संघाने शिक्षक महाभोंडला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला.
श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक आणि सांस्कृतिक ट्रस्टच्या वतीने आयोजित नवरात्र उत्सवात शिक्षक महाभोंडला स्पर्धा घेण्यात आली. या वेळी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, डॉ. मनोरमा आवारे,
ट्रस्टच्या विश्वस्त डॉ. तृप्ती अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, स्पर्धेच्या परीक्षक श्रुती पंडित, साधना कानिटकर आदी उपस्थित होते. धारेश्वर विद्यालयाला ११ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले.
विश्वकर्मा विद्यालयाच्या शाळेच्या शिक्षक संघाचा द्वितीय, तर चंद्रकांत दरोडे विद्यालयाने तृतीय क्रमांक पटकावला. स्मृतिचिन्ह, अनुक्रमे ७ हजार आणि ५ हजार रोख रक्कम, सन्मानचिन्ह प्रशस्तिपत्रक असे पुरस्काराचे स्वरूप होते. या वेळी पहिल्या तिन्ही क्रमांकांच्या विजेत्यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली.
असुरांचा वावर वाढतो, तेव्हा आदिमाया, आदिशक्ती महिषासुरमर्दिनीचे रूप घेते. ते महिलांनी आपल्यामध्ये जागृत ठेवायला हवे. पुणे विद्येचे माहेरघर असूनही येथे मुलींचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे समाजात सर्वांपर्यंत नवदुर्गेच्या रूपाचे महत्त्व पोहोचायला हवे, असे चाकणकर म्हणाल्या.
भोंडला हा प्रकार अनेक वर्षांपासून नवरात्रीमध्ये केला जातो. मात्र, आज लहान मुली आणि तरुणांनी याची फारशी माहिती नाही. त्यामुळे शाळेतील शिक्षकांनी भोंडल्याविषयी अधिकाधिक माहिती गोळा करून विद्यार्थ्यांना द्यावी, यासाठी स्पर्धेचे आयोजन केल्याची माहिती डॉ. तृप्ती अग्रवाल यांनी दिली. चोरबेले यांनी आभार मानले.





