पुणे जिल्हा | उद्योजक बनविणारे धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठान

माळेगाव, (वार्ताहर)- बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक येथील धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला ३० वर्षे पूर्ण झाली आहेत.
नाविन्यपूर्ण उपक्रमात मंडळ अग्रेसर आहे. उद्योजक बनविणारे प्रतिष्ठान म्हणून ख्याती आहे. उपक्रम राबविणारे महाराष्ट्रातील एकमेव प्रतिष्ठान आहे. प्रतिष्ठानने सामाजिक सलोखा जपला आहे.
साऊंड सिस्टिमला थारा न देता गेली तीन वर्ष ढोल ताशाच्या गजरात माळेगाव ते गणपतीपुळे अशी श्रींची विसर्जन मिरवणूक काढण्यात येते. गणपतीपुळे मंदिरासमोर समुद्रकिनारी ढोल ताशाच्या गजरात मोरयाच्या जयघोषात गणरायाचे विसर्जन करण्यात येत आहे.
धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अमित विजयराव तावरे यांच्या संकल्पनेतून सतत नावीन्यपूर्ण उपक्रमात प्रतिष्ठान अग्रेसर ठरले आहे. प्रतिष्ठानने आतापर्यंत जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा, बेटी पढाव, बेटी बचाव अभियान, रक्तदान शिबिर, अंधश्रद्धाला फाटा देण्यासाठी जादूगाराच्या प्रयोगातून समाज प्रबोधन, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शालेय साहित्य वाटप,
शालेय स्तरीय विविध स्पर्धा, मूक बधिर व अनाथ मुलांना आर्थिक मदत, मंडळाच्या वतीने महाराष्ट्राचा इतिहास नागरिकांपर्यंत पोहोचवा, यासाठी जुन्या काळातील सूर्यसेट, राजवाडे सेट, आदी विविध देखावे,
भारुडाचे कार्यक्रम, नागरिकांसाठी मोठमोठे भजन-कीर्तन कार्यक्रम, महिलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी रांगोळी स्पर्धा, युवकांसाठी हिप्नॉटिझमचा कार्यक्रम, लहान मुलांसाठी डान्स स्पर्धा आदी विविध कार्यक्रमांची प्रतिष्ठानतर्फे घेण्यात येत आहे.
प्रतिष्ठानमुळे ५० युवक उद्योगस्नेही
नाविन्यपूर्ण उपक्रमाबरोबर मंडळातील सोबत असेलेल्या युवकांना उद्योजक बनवण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा प्रयत्न प्रतिष्ठानच्या वतीने केला जात आहे.
प्रतिष्ठानमधील ४० ते ५० युवकांचे यशस्वीपणे व्यवसाय सुरू आहेत. पुढील पिढीला उद्योगासाठी प्रेरणा देण्याचे काम प्रतिष्ठानकडून सुरू आहे.
लहानपणीच्या संवगडींना सोबत घेऊन संभाजीनगरचा सार्वजनिक गणेशोत्सव करत असताना युवा उद्योजक बनवण्याचे जे स्वप्न पाहिले होते. ते आज प्रत्यक्षात साकार होत आहे.
ज्येष्ठ नागरिकांना, रुग्णांना होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाचा त्रास टाळण्यासाठी गेली तीन वर्षे गणपतीपुळे येथे ट्रॅव्हल्सद्वारे जाऊन श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात येत आहे. – अमित विजयराव तावरे, संस्थापक अध्यक्ष, धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठान, माळेगाव बुद्रुक.





