धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ; ‘त्या’ प्रकरणात न्यायालयाने बजावली कारणे दाखवा नोटीस

Dhananjay Munde | मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर अन्नपुरवठा मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीचा जोर वाढला आहे. यातच आता धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. परळीच्या फौजदारी न्यायालयाने मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा झटका दिला आहे. विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरताना खरी माहिती दडवल्याचा आरोप करुणा शर्मा यांनी दाखल केला होता. याप्रकरणी धनंजय मुंडेंना कोर्टाने कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण ?
धनंजय मुंडे यांनी 2024 मध्ये परळी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी दाखल उमेदवारी अर्जासोबतच्या शपथपत्रात पत्नी राजश्री मुंडे आणि तीन मुली तसेच करुणा मुंडे यांच्या दोन मुलांचा उल्लेख केला होता. परंतु करुणा मुंडे यांच्या नावावरील मिळकतीबाबत कुठलाही उल्लेख केला नव्हता.
धनंजय मुंडे यांनी वरील खरी माहिती दडविल्याबाबत करुणा मुंडे यांनी बीड येथून परळीच्या फौजदारी न्यायालयात ऑनलाइन तक्रार केली होती. तक्रारीची मूळ कागदपत्रे 5 फेब्रुवारी रोजी न्यायालयासमोर दाखल केली. त्यावरूनच न्यायालयाने आदेश दिले असल्याचे तक्रारदाराचे वकील चंद्रकांत ठोंबरे यांनी म्हटले आहे. कोर्टाने बजावलेल्या कारणे दाखवा नोटिसवर 24 फेब्रुवारी 2025 रोजी परळीच्या फौजदारी न्यायालयात सुनावणी होणार आहे.
धनंजय मुंडेंचे पाय खोलात
दरम्यान, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याला अटक करण्यात आली आहे. वाल्मिक कराडशी असलेल्या संबंधावरून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. त्याशिवाय, विरोधकांनी काही भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा आरोप करत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. Dhananjay Munde |
याशिवाय मुंडे यांच्या कार्यकाळातील बीड जिल्हा नियोजन समितीमधील निधी वितरणातील अनियमिततेचा मुद्दाही समोर आला आहे. याच अनुषंगाने पालकमंत्री अजित पवार यांनी मागील दोन वर्षांमध्ये झालेल्या 877 कोटी रुपयांच्या निधीची चौकशी सुरू केली आहे. एकीकडे राजीनामाच्या मागणीचा दबाव वाढत असताना कोर्टाने दिलेल्या या आदेशानंतर धनंजय मुंडे यांचे पाय खोलात गेल्याचे दिसत आहे. Dhananjay Munde |
हेही वाचा:





