धनंजय मुंडेंविरोधात अटक वॉरंट निघणार? ‘त्या’ प्रकरणाची आज परळी कोर्टात होणार सुनावणी

Dhananjay Munde Arrest Warrant | मागील काही दिवसांपासून मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होत आहे. यातच आता करूणा शर्मा यांच्यामुळे त्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. निवडणूक शपथपत्रातील माहिती लपवल्याप्रकरणाची सुनावणी आज परळी कोर्टात होणार आहे.
विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना खरी माहिती दडवल्याबाबत करुणा शर्मा यांनी ऑनलाइन तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने परळीच्या फौजदारी न्यायालयाने मंत्री धनंजय मुंडे यांना न्यायालयाची कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे. याबाबत आज परळीच्या फौजदारी न्यायालयात सुनावणी होणार आहे. समजा, धनंजय मुंडे न्यायालयात हजर राहिले नाही, तर अटक वॉरंट निघू शकते असा तक्रारदाराचे वकील चंद्रकांत ठोंबरे यांनी सांगितलं आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
धनंजय मुंडे यांनी 2024 मध्ये परळी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी दाखल उमेदवारी अर्जासोबत जे शपथपत्र दाखल केलं होतं, त्यात त्यांनी पत्नी राजश्री मुंडे आणि ३ मुली तसेच करुणा मुंडे यांच्या २ मुलांचा उल्लेख केला होता. मात्र करुणा मुंडे यांच्या नावावरील मिळकतीबाबत कुठलाही उल्लेख त्यांनी केला नव्हता. त्यांनी खरी माहिती लपवल्याबाबत करुणा मुंडे यांनी बीड येथून परळीच्या फौजदारी न्यायालयात ऑनलाइन तक्रार दाखल केली होती. तक्रारीची मूळ कागदपत्रे ५ फेब्रुवारी २०२५ रोजी न्यायालयासमोर दाखल केली. त्यावरून न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा आदेश दिला. त्यावर आज सुनावणी होणार आहे. Dhananjay Munde Arrest Warrant |
दरम्यान, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे अडचणीत सापडले आहेत. वाल्मीक कराडशी धनंजय मुंडे यांचे असलेले निकटचे संबंध पाहता, संतोष देशमुख प्रकरणाशी धनंजय मुंडेंचं नाव जोडलं जात आहे. यातच आता करुणा मुंडे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतरही धनंजय मुंडे अडचणीत सापडले आहे. Dhananjay Munde Arrest Warrant |
हेही वाचा:
जामखेड: गाडीने अचानक पेट घेतल्याने दोघांचा होरपळून मृत्यू; एका पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश





