जामखेड: गाडीने अचानक पेट घेतल्याने दोघांचा होरपळून मृत्यू; एका पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश

जामखेड : शहरातील बीड रोडवर नवले पेट्रोल पंपाजवळ रस्त्यावर दुभाजकाला इरटीका कार धडकली. गाडीतील सीएनजी गॅसने पेट घेतला. यामध्ये गाडीतील दोन जणांचा जळून मृत्यू झाला असून यामध्ये पोलीस काॅन्स्टेबलचा समावेश आहे. ही घटना दि २४ रोजी पहाटे ४ वाजेदरम्यान घडली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह अआणि सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनीही घटनास्थळी धाव घेतली. जामखेड नगरपरिषदच्या आय्यास शेख, विजय पवार, अहमद शेख या अग्निशमन दलाच्या जवानांकडून तब्बल एक तास पाण्याचा मारा करण्यात आला. मात्र तोपर्यंत गाडीने पुर्ण पेट घेतला होता. गाडीमधे जळुन मृत्यू झालेल्यामध्ये जामखेडचे पोलीस स्टेशनचे काॅन्स्टेबल धनंजय गुडवाल व जामखेड मधील साईनाथ पाँन शॉपचे व्यापारी महादेव काळे यांचा समावेश आहे.
गाडीची दुभाजकाला जोराची धडक बसल्याने गाडीचा टायर १००-१५० फुटावर फेकले गेले. इरटीका गाडीची रचना अत्याधुनिक पध्दतीची असल्याने गाडी लॉक झाली त्यामुळे आतील दोन जणांना बाहेर पडता आले नाही. ज्यात दोघांना आपला जीव गमवावा लागला. सदर घटनेची पुढील माहिती पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस घेत आहेत.





