धनंजय मुंडेंनी मांडलं आरक्षणाचं गणित, OBC कट ऑफ 485, EWS 450… मराठा तरुणांना विशेष आवाहन

बीड : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या राज्यात चर्चा सुरू असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी सावरगाव येथील दसरा मेळाव्यात जोरदार भाषण केले. मंत्रिपदापासून दूर झाल्यानंतर काहीसे शांत असलेले धनंजय मुंडे या मेळाव्यात मात्र पूर्ण फॉर्मात दिसले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका करताना, आरक्षणाची आकडेवारी मांडत मराठा तरुणांना डोळसपणे विचार करण्याचे आवाहन त्यांनी केले.
गोपीनाथ मुंडे यांनी सुरू केलेली दसरा मेळाव्याची परंपरा पंकजा मुंडे यांनी यंदाही अखंडित ठेवली. या मेळाव्यास पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे, धनंजय मुंडे, महादेव जानकर यांच्यासह भाजपचे आमदार उपस्थित होते. यावेळी धनंजय मुंडे यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सविस्तर भाष्य केले.
आरक्षणाचं गणित मांडलं –
धनंजय मुंडे म्हणाले, “मराठा आरक्षणासाठी आम्हीही प्रयत्न केले आहेत. मी नेहमीच कोणत्याही समाजाच्या आरक्षणासाठी लढणारा कार्यकर्ता आहे. पण काही जण केवळ स्वतःच्या फायद्यासाठी आणि खुर्चीसाठी आरक्षणाचा मुद्दा पुढे करत आहेत. नुकत्याच जाहीर झालेल्या एमपीएससी राज्यसेवा परीक्षेच्या निकालात ओबीसी प्रवर्गाचा कट ऑफ ४८५ गुणांचा होता, तर आर्थिकदृष्ट्या मागास (EWS) प्रवर्गाचा कट ऑफ ४५० गुणांचा होता. मराठा समाजातील उमेदवाराने EWS मधून परीक्षा दिली असती, तर तो ४५० गुणांवर उत्तीर्ण झाला असता. पण आता ओबीसींच्या कोट्यातून संधी मिळाली नाही, हे वास्तव आहे. मग यात कोणाला फसवण्याचा प्रयत्न होतोय?” असा सवाल करत त्यांनी मराठा तरुणांना या आकडेवारीकडे डोळसपणे पाहण्याचे आवाहन केले.
“ह्याच्या ताटातून त्या ताटात देऊ नये” –
धनंजय मुंडे पुढे म्हणाले, “EWS चा कट ऑफ कमी असतानाही केवळ ओबीसी कोट्यातून आरक्षण घेण्याचा हट्ट समाजाच्या हितासाठी नाही, तर काही मोजक्यांना खुर्च्या मिळवायच्या आहेत. मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीसाठी सरकारने शक्य तेवढं दिलं आहे आणि देतही आहे. मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण आता ह्याच्या ताटातून काढून त्या ताटात देण्याची वेळ येऊ नये.”
पंकजा मुंडेंचे कौतुक –
गोपीनाथ मुंडे यांनी सुरू केलेली दसरा मेळाव्याची परंपरा पंकजा मुंडे यांनी कोणताही खंड न पडू देता सुरू ठेवल्याबद्दल धनंजय मुंडे यांनी त्यांचे कौतुक केले. “यंदा अतिवृष्टी आणि पुरामुळे अडचणी आल्या, तरीही साध्या पद्धतीने का होईना, पंकजा यांनी हा मेळावा यशस्वी केला,” असे ते म्हणाले. या मेळाव्याने मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या चर्चेला नवं वळण मिळालं असून, धनंजय मुंडे यांच्या विधानांमुळे राजकीय वर्तुळातही खलबतं सुरू झाली आहे.





