Dhananjay Munde : भुजबळांना डच्चू देऊन, ऐनवेळी दिली धनंजय मुंडेंच्या नावाला पसंती; शपथविधी पूर्वी नेमकं काय घडलं? अजित पवार म्हणतात….

Chhagan Bhujbal | Dhananjay Munde : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार नुकताच (दि. 15 डिसेंबर) नागपूर येथे पार पडला. यावेळी महायुतीच्या 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी पहिली मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये भाजपच्या सर्वाधिक 19, शिवसेना (शिंदे गट) 11 तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली.
हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपूरमध्ये सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, दत्तात्रय भरणे, आदिती तटकरे, माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ, मकरंद पाटील, बाबासाहेब पाटील, इंद्रनील नाईक या नेत्यांनी शपथ घेतली.
परंतु, मंत्र्यांच्या या यादीत छगन भुजबळ यांना डच्चू देण्यात आला आहे. धनंजय मुंडे यांचंही नाव नव्हतं. मात्र ऐनवेळी धनंजय मुंडे यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. तसेच मंत्र्यांच्या यादीत दिलीप वळसे, धर्मराव अत्राम, अनिल पाटील यांनांही मंत्रिमंडळातून वगळण्यात आले आहे.
याबाबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना विचारले असता त्यांनी अजित पवार यांच्याकडे हा प्रश्न फिरवला. तर अजित पवारांनीही उरलेल्या दोन नावांवर बोलण्यास नकार दिला. मंत्री ठरवायचा अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आहे, असं म्हणत अजित पवारांनी पत्रकारांच्या प्रश्नाला बगल दिली, त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून भुजबळांच्या नाराजीवर विरोधकांकडून प्रतिक्रिया दिल्या जात असून, अजित पवारांना टार्गेट करण्याचा प्रयत्न होत आहे.





