Dhananjay Deshmukh : बीडमध्ये खळबळ ! धनंजय देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल
मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांच्या विरोधात बीडमध्ये अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्याने जिल्हाभरात मोठी खळबळ उडाली आहे.

Dhananjay Deshmukh : मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांच्या विरोधात बीडमध्ये अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्याने जिल्हाभरात मोठी खळबळ उडाली आहे.
अंगरक्षकाचे रिव्हॉल्व्हर काढून थेट डोक्याला लावत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा खळबजनक आरोप समाधान खिंडकर यांनी केला आहे. या तक्रारीनंतर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस तपास सुरू झाला आहे.
हॉटेलमधील वादातून थरार
बेलवाडी (जि. बीड) येथील रहिवासी असलेले फिर्यादी समाधान खिंडकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ३० मे रोजी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास ते त्यांचे मित्र दीपक मनेरी आणि अन्य एका सहकाऱ्यासोबत जेवणासाठी एका हॉटेलमध्ये गेले होते. त्याच हॉटेलमध्ये धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) हे देखील त्यांच्या काही सहकाऱ्यांसह उपस्थित होते.
त्यांच्यासोबत प्रसिद्ध ‘रिल स्टार’ रवीराज साबळे आणि इतर २ ते ३ अनोळखी व्यक्ती होत्या. खिंडकर हे रवीराज साबळे यांना मोबाईलमधील काही माहिती दाखवत असताना, देशमुखांच्या अंगरक्षकाने त्यांचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला. मोबाईल का घेतला, अशी विचारणा केली असता धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) तिथे आले आणि वादाला तोंड फुटले.
“माझ्याकडे खूप पैसा आहे, तुला सहज संपवेन!”
समाधान खिंडकर यांनी तक्रारीत अत्यंत धक्कादायक आरोप केले आहेत. वादादरम्यान धनंजय देशमुख यांनी, “माझ्याकडे एवढा पैसा आहे की मी तुला सहज संपवू शकतो,” अशी धमकी दिली. त्यानंतर त्यांनी अंगरक्षकाच्या कंबरेला असलेले सरकारी रिव्हॉल्व्हर काढून थेट खिंडकर यांच्या डोक्याला लावले आणि “तुला जिवंत सोडणार नाही,” असा दम भरला. तसेच त्यांच्यासोबत असलेल्या अन्य व्यक्तींनी खिंडकर यांना बेदम शिवीगाळ केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
खिंडकर बंधूंच्या वादाला ‘संतोष देशमुख हत्या’ प्रकरणाची पार्श्वभूमी?
या संपूर्ण प्रकरणाला कौटुंबिक आणि जुन्या वादाची मोठी पार्श्वभूमी असल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच समाधान खिंडकर यांच्याविरोधात त्यांचा सख्खा भाऊ दादा खिंडकर यांनी धमकी दिल्याची तक्रार दाखल केली होती.
काय आहे अंतर्गत वाद?
दादा खिंडकर आणि धनंजय देशमुख हे एकमेकांचे साढू (नातेवाईक) आहेत. दादा खिंडकर यांनी आरोप केला होता की, समाधान खिंडकर याने त्यांना “धनंजय देशमुख यांच्यासोबत राहू नको, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात साक्ष देऊ नकोस आणि हे प्रकरण मिटवून घे, अन्यथा याचे परिणाम वाईट होतील,” अशी धमकी दिली होती. भावाने तक्रार दिल्यानंतर आता समाधान खिंडकर यांनी थेट धनंजय देशमुखांवर गुन्हा दाखल केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.
बीडच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ
सलग दोन दिवसांत एकमेकांविरोधात दाखल झालेल्या या गंभीर तक्रारींमुळे देशमुख आणि खिंडकर कुटुंबातील अंतर्गत मतभेद आणि जुना वाद आता उघडपणे चव्हाट्यावर आला आहे. त्यातच थेट शस्त्राचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे समोर आल्याने बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. बीड ग्रामीण पोलीस या संपूर्ण हाय-प्रोफाईल प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.






