Dhananjay Deshmukh : धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्या भेटीनंतर धनंजय देशमुखांनी दिला इशारा; म्हणाले…

बीड : भाजपचे आमदार सुरेश धस यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांची भेट घेतली होती. या भेटीमुळे सध्या राजकारण पेटले आहे. विरोधकांकडून सुरेश धस यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्या भेटीवर आता मृत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले धनंजय मुंडे?
धस आणि मुंडे यांच्या भेटीने मनात चलबिचल नाही. गाव आहे, लोकप्रतिनिधी आहेत, या लढ्याला त्यांनी स्वतःच्या अंगावर घेतलं आहे. या प्रकरणात कुणीही दगाफटका करू नये, एकही आरोपी सुटता कामा नये ही आमची प्रामाणिक अपेक्षा आहे. एखादा आरोपी सुटणार आहे, असं जेव्हा आम्हाला वाटले. त्यावेळी मी आणि माझे कुटुंब टोकाचं पाऊल उचलणार आहे, असा गंभीर आणि निर्वाणीचा इशाराच धनंजय देशमुख यांनी दिला आहे.
आम्हा देशमुख कुटुंबीयांना न्याय हवा आहे. त्यासाठी सर्व घटकांची आम्हाला खूप गरज आहे. मनोज जरांगे आले नसते तर हा खून आठ ते दहा दिवसात त्यांनी पचवला असता असे धनंजय देखमुख म्हणाले. मनोज जरांगे यांनी धस यांच्यावर टीका केली. त्यावरही धनंजय देशमुख यांनी भाष्य केलं. यामध्ये मनोज जरांगेची भावना मोठी आहे. या प्रकरणातील एकही आरोपी सुटू नये म्हणून त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. यात काहीही चूक नाही. समाजात अशी दुसरी घटना होऊ नये म्हणून ते बोलतात. यात त्यांचं एकही वाक्य चुकीच नाही, असे धनंजय देशमुख म्हणाले.





