‘धनंजय’: धनुर्धर अर्जुनाच्या जीवनावरील चित्तथरारक कादंबरी

नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम्।
देवीं सरस्वतीं चैव ततो जयमुदीरयेत्।।
जिथे कर्णावरील एकांगी कादंबऱ्यांनी महाभारतासारख्या महाकाव्याची आणि पर्यायाने अर्जुनाच्या इमेज ची अपरिमित हानी केली आहे, त्या पार्श्वभूमीवर ‘धनंजय’ नक्कीच दिलासा देणारी कादंबरी आहे.
धनंजय हि कादंबरी मुख्यतः भांडारकर संशोधित आवृत्तीवर आधारित पं डॉ. श्रीपाद दामोदर सातवळेकर यांच्या पंधरा संस्कृत – हिंदी खंडांवर आधारित आहे. धनंजय ची कथा मूळ व्यास भारताला धरून आहे. मूळ कथेशी कुठलीही प्रतारणा न करता, ती जशी आहे तशी, अतिशय ओघवत्या भाषेत वाचकांपुढे ठेवली आहे..
महाभारताचा खरा नायक – महानायक अर्जुन हाच आहे. हो, अगदी कृष्ण कर्ता-करविता असला तरी! वरील श्लोकात स्वतः वेदव्यास, नारायण आणि नर ऋषी (अर्जुन) यांना वंदन करून पुढील महाकाव्य लिहायला सुरुवात करतात. परंतु व्यास भारतात देखील अर्जुनाचे फार संवाद नाहीत, जे आहेत ते जास्त करून कृष्णासोबत संवाद आहेत. अर्जुन कुठेही त्याच्या भावना फार व्यक्त करत नाही.
त्यामुळेच अर्जुनाची बाजू मांडून, अर्जुनाच्या दृष्टिकोनातून पांडवांचा प्रवास आणि महाभारत कथा मांडली आहे.
महाभारताप्रमाणेच कथा अर्थातच अर्जुनाची आहे. अखेरचा आरंभ – पांडवांच्या स्वर्गारोहण पर्वापासून पुस्तकाची सुरुवात होते आणि इथून अर्जुन आपल्याला भूतकाळात घेऊन जातो. इथून पुढचा प्रत्येक प्रसंग, कथा कितीही माहिती असली तरी डोळ्यासमोरून सरकत राहतो..
कादंबरी वाचताना अनेक सुप्त पदर आपल्यासमोर उलगडत जातात. कर्णावर आधारित कादंबर्यांनी कर्णावर प्रकाश टाकण्यासाठी महाकाव्याचा विपर्यास करण्याचा प्रयत्न केला, तर धनंजयने वस्तुस्थिती प्रामाणिकपणे आणि खात्रीने मांडली.
ज्या गोष्टी आजपर्यंत आपण खऱ्या मानत आलो, किंवा अनेक कथाकारांनी दूरचित्र वाहिन्यांनी आपल्यासमोर त्या कथा ते प्रसंग तसे सादर केले म्हणून तेच खरं मानत आलो , त्या समजुतींना नक्कीच तडा जातो.
गुरु द्रोण कर्णाचं शिष्यत्व नाकारत नाहीत, कर्ण सुद्धा गुरु द्रोणांच्या आश्रमात शिकतो,द्रौपदी स्वयंवरात कर्णाने लक्ष्यभेद करायचा प्रयत्न केला परंतु तो लक्ष्यभेद करू शकला नाही, द्रौपदीने त्याला कुठेही ‘सूतपुत्र’ म्हणून हिणवलं नाही, मयसभेत द्रौपदी उपस्थित नसल्याने दुर्योधनाचा अपमान करण्याचा प्रश्नच येत नाही.
कर्णाने प्रत्येक युद्धात, प्रत्येक वेळी केलेलं पलायन.. अर्जुनाने जयद्रथाचा केलेला पराभव – कृष्णानं सुदर्शन चक्राच्या साहाय्याने सूर्यबिंब झाकलेलं नसून अर्जुनाने स्वपराक्रमावर स्वबळावर जयद्रथाचा वध केला आहे. या आणि अशा अनेक समजुतींना धक्का बसतो. काही प्रसंग अत्यंत सुंदर पद्धतीने वाचकांसमोर मांडले आहेत. द्रौपदी स्वयंवरात अर्जुन, कृष्ण आणि पांचाली यांना एकाच क्षणी बघतो आणि दोन्ही कृष्णांबद्दलचे (द्रौपदीचे दुसरे नाव कृष्णा असते) त्याचे भाव, आणि त्याच्या जीवनावरची त्यांची पकड छान शब्दात मांडली आहे.
तसेच अर्जुनाची कृष्णासोबतची मैत्री आणि भक्ती उत्तम प्रकारे सांगितली आहे. याव्यतिरिक्त कृष्णाने टाकलेले राजकीय डाव, अर्जुनाची रणनीती, दुर्योधनाचा मुत्सद्दीपणा, भीष्म-द्रोणांची हतबलता, कृष्णार्जुनांनी केलेली धर्मस्थापना यावर उत्तम रित्या प्रकाश टाकला आहे. धनुर्विद्येबद्दल अर्जुनाचे उत्कट प्रेम, युद्धकलेतलं असामान्य कौशल्य,
अनेक युद्धातून केलेले पराक्रम – गुरुदक्षिणा म्हणून द्रुपदाचा पराभव, चित्ररथ गंधर्वाचा पराभव, द्रौपदी स्वयंवराच्या वेळी कर्णासह सगळ्या राजांचा केलेला पराभव, राजसूय यज्ञापूर्वी केलेला उत्तर- दिग्विजय, वनवासात असताना किरात रूपातील महादेवांशी झुंज, लक्षावधी निवातकवच राक्षसांचा एकट्यानं केलेला संहार, वनवासात द्रौपदीहरण केल्यानंतर जयद्रथाचा केलेला पराभव, विराट युद्धात सर्व कौरवांचा एकहाती केलेला पराभव (हे सर्व कृष्णाच्या अनुपस्थितीत केलेले पराभव आहेत), युद्धात जयद्रथाचा नियोजित वेळ सांगून केलेला वध आणि महाभारत युद्धात अप्रतिम युद्धकलेचा घडवलेला साक्षात्कार, हा सगळा रोमांचकारी इतिहास आपल्याला धनंजय मध्ये वाचायला मिळतो.
अर्जुनाच्या युद्धकौशल्याला धर्माचं, नीतीचं अधिष्ठान होतं हे नक्कीच जाणवत राहतं. जो स्वतः भगवंताला अतिशय प्रिय आहे, ज्याच्याशिवाय जगाला भगवद्गीता मिळाली नसती, ज्याच्याशिवाय धर्माची पुनर्स्थापना शक्य नव्हती, अशा अर्जुनाची, एक वेगळा अनुभव देणारी म्हणून हि कादंबरी नक्कीच वाचनीय आहे.
लेखक – राजेंद्र खेर
प्रकाशन – विहंग प्रकाशन





