Dhairyashil Kadam : मंत्र्यांची फौज आणि जोरदार शक्तिप्रदर्शन; धैर्यशील कदमांचा उमेदवारी अर्ज दाखल
Dhairyashil Kadam : सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपचे धैर्यशील कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल; पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत जोरदार शक्तिप्रदर्शन.

Dhairyashil Kadam – विधान परिषदेच्या सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी सोमवारी दुपारी जोरदार शक्तिप्रदर्शन करत, उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राज्याचे मंत्री आणि भाजपचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, खासदार उदयनराजे भोसले, पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत धैर्यशील कदम यांनी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज सादर केला.
सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक यंदा चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. या मतदारसंघात सातारा जिल्ह्यातील मतदारांची संख्या सांगली जिल्ह्यापेक्षा अधिक असल्याने, या निवडणुकीत सातारा जिल्ह्याचे महत्त्व वाढले आहे. भाजपने सातारा जिल्ह्यातील संघटनात्मक ताकद आणि स्थानिक नेतृत्वाच्या बळावर मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
उमेदवारी निश्चित होण्यापूर्वी पक्षांतर्गत चर्चेला वेग आला होता. खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांचे समर्थक व पक्षाचे सातारा लोकसभा मतदारसंघ संयोजक सुनील काटकर यांच्या नावासाठी आग्रह धरल्याचे बोलले जात होते. त्यासाठी उदयनराजेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. सुनील काटकर यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी संपर्क साधला होता.
दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे त्यांचे व्याही पृथ्वीराज देशमुख यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील होते. मात्र, पक्षातील वरिष्ठ पातळीवरील चर्चेनंतर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या शिफारशीला मान्यता देत, धैर्यशील कदम यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. कदम यांना पक्षाने मोठी संधी दिल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
धैर्यशील कदम यांनी 2014 मध्ये काँग्रेसमध्ये, 2019 मध्ये शिवसेनेत आणि त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला. 2023 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊन, पक्षनिष्ठा दाखवली होती. त्यानंतर सातारा जिल्हाध्यक्षपदासह विविध संघटनात्मक जबाबदार्या सांभाळत त्यांनी पक्षात सक्रिय भूमिका बजावली.
विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी मिळाल्याने त्यांचे राजकीय पुनर्वसन झाल्याची चर्चा असून, त्यांच्या विजयासाठी भाजपने तयारीला वेग दिला आहे. पक्षाचे सर्व मंडलाध्यक्ष व पदाधिकार्यांना निवडणुकीच्या नियोजनाबाबत सूचना देण्यात आल्या असून, कमद यांच्या विजयासाठी भाजपने कंबर कसली आहे.






