पाकच्या ‘या’ महिला नेत्याने दिला पंतप्रधान इम्रान खान यांना इशारा ; म्हणाल्या…

इस्लामाबाद : पाकिस्तानमधील विरोधी पक्ष नेत्या म्हणून समोर आलेल्या मरियम नवाज यांनी पंतप्रधान इम्रान खान यांना ३१ जानेवारी २०१२ पर्यंत सत्ता सोडण्याचा इशारा दिला आहे. मरियम नावज पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची मुलगी आणि पीएमएल-एन पक्षाच्या नेत्या आहेत. इम्रान खान यांनी ३१ जानेवारीपर्यंत सन्मापूर्वक पद्धतीने पदत्याग करुन सत्ता सोडावी. इम्रान यांनी असे केले नाही तर आम्ही विशाल मोर्चाचे आयोजन करु असा इशाराही मरियम यांनी दिला आहे.
मरियम नवाज यांनी इम्रान खान सरकारने ३१ जानेवारीपर्यंत राजीनामा दिला नाही तर विरोधी पक्षातील सर्व खासदार राजीनामा देतील असेही म्हटले आहे. संतापलेल्या मरियम यांनी गर्दी इतर पद्धतीचे निर्णयही घेऊ शकते, असा सूचक इशारा सरकारला दिलाय. पंतप्रधान इम्रान खान यांनी मात्र मरियम यांच्या इशाऱ्याकडे दूर्लक्ष केले आहे. ११ विरोधी पक्ष एकत्र येऊन तयार झालेल्या पीडीएम या विरोधकांच्या गटापासून आपल्या सरकारला कोणताही धोका नसल्याचे इम्रान यांनी म्हटले आहे.
सोमवारी आपल्या प्रवक्त्यांच्या बैठकीला संबोधित करताना इम्रान यांनी पीडीएम हा सरकारविरोधात मोर्चेबांधणी करणारा विरोधी पक्षांचा गट पूर्णपणे भरकटला असल्याचे मत नोंदवले. या लोकांकडून आपल्या सरकारला कोणताही धोका नसल्याचे इम्रान यांनी सहकाऱ्यांना सांगितले आहे. सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्या डेमोक्रेटीक मुव्हमेंटच्या (पीडीएम) नेत्यांचा मुख्य हेतू नॅशनल रीकंसिलिएशन ऑर्डिन्ससारख्या सवलती मिळवण्याचा आहे. मात्र मी त्यांना कोणतीही मूभा देणार नाही, असे इम्रान यांनी स्पष्ट केले आहे.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान परवेझ मुशर्रफ यांनी ५ ऑक्टोबर २००७ रोजी नॅशनल रीकंसिलिएशन ऑर्डिन्स या नावाखाली एक अध्यादेश जारी केला होता. यानुसार १ जानेवारी १९८६ ते १२ ऑक्टोबर १९९९ दरम्यान कोणत्याही राजकीय, सरकारी आणि इतर प्रशासकीय अधिकाऱ्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यांमधून सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. १६ डिसेंबर २००९ रोजी पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाने हा अध्यादेश बेकायदेशीर असल्याचा निकाल दिला. तेव्हापासून या अध्यादेशावरुन देशामध्ये राजकीय वाद सुरु आहे.
इम्रान खान यांनी विरोधी पक्षांवर आरोप करताना करोनासंदर्भातील इशारा जारी करण्यात आल्यानंतर विरोधी पक्ष मोठ्या रॅलीचं आयोजन करताना दिसत असल्याची टीका केली आहे . अनेक ठिकाणी रॅलीचं आयोजन करुन विरोधी पक्ष सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळत आहेत असा टोलाही पंतप्रधान इम्रान खान यांनी लगावला आहे.
विरोधकांच्या पीडीएमचे नेते आणि इम्रान खान यांच्यातील शाब्दिक बाचाबाची मागील काही काळापासून शिगेला पोहचली असून त्यामुळे पाकिस्तानमधील वातावरण चांगलच तापलं आहे. बहावलपुरमधील एका रॅलीमध्ये मरियम नवाज यांनी येथे आलेले अनेकजण हे काहीतरी अपेक्षेने आले आहे. यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या रॅलीमध्ये एवढी गर्दी कधी झाली नव्हती, असेही मरियम म्हणाल्या. ही गर्दी पाहूनच मी पंजाबला आता जाग आलीय असे म्हणत असल्याचं मरियम यांनी भाषणात म्हटले होते.





