Nevasa : श्री शिव महापुराण कथेत नाथबाबांच्या आरतीचे भक्तिमय विमोचन
Nevasa : या प्रसंगी ह.भ.प.समाधान महाराज शर्मा, महापौर ज्योती गाडे,उपमहापौर धनंजय जाधव, राष्ट्रवादीचे संग्राम कोते आदी विविध नगरसेवकांच्या शुभ हस्ते "श्री विश्वेश्वर नाथबाबांच्या आरतीचे" विमोचन व नाथबाबांच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले.

नेवासे : ऐतिहासिक अहिल्यानगर शहरात सध्या भक्तिरसाची गंगा वाहत आहे. उपमहापौर तथा नेवासा बुद्रुकचे भूमिपुत्र धनंजय जाधव यांच्या पुढाकारातून ह.भ.प.समाधान महाराज शर्मा यांच्या रसाळ वाणीतून “श्री शिव महापुराण कथा” सुरू असून, हजारो श्रोते या कथेचा लाभ घेत आहेत.
दि.१८ नोव्हेंबर २०२६ रोजी या कथेत एक आगळा – वेगळा भक्तिमय सोहळा पार पडला. श्री विश्वेश्वर नाथबाबा विश्वस्त मंडळ आणि नेवासा बुद्रुक येथील ग्रामस्थ यांना आरतीचा विशेष सन्मान देण्यात आला.
आरतीचे विमोचन व पोस्टरचे अनावरण
या प्रसंगी ह.भ.प.समाधान महाराज शर्मा, महापौर ज्योती गाडे,उपमहापौर धनंजय जाधव, राष्ट्रवादीचे संग्राम कोते आदी विविध नगरसेवकांच्या शुभ हस्ते “श्री विश्वेश्वर नाथबाबांच्या आरतीचे” विमोचन व नाथबाबांच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. टाळ्यांच्या गजरात आणि “हर हर महादेव” च्या जयघोषात संपूर्ण मंडप भक्तिमय झाला.
उपमहापौर धनंजय जाधव यांच्या संकल्पनेतून आणि गायक गिरीराज जाधव यांच्या रसाळ, सुमधुर वाणीतून श्री विश्वेश्वर नाथबाबांच्या आरतीचे गायन करण्यात आले. गिरीराज जाधव यांच्या आवाजाने श्रोते मंत्रमुग्ध झाले. या कार्यक्रमाची संकल्पना आणि कार्यसिद्धी उपमहापौर धनंजय जाधव यांची होती.अत्यंत गोड आणि शिस्तबद्ध नियोजन, नाथबाबांच्या आरतीसाठी असलेला गिरीराज जाधव यांचा सुमधुर आवाज, परमपूज्य शांती ब्रह्म भास्करगिरी महाराज (श्रीक्षेत्र देवगड) यांचा शुभ आशीर्वाद, हजारो श्रोत्यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते ह.भ.प. समाधान महाराज शर्मा आणि सर्व राजकीय, सामाजिक, धार्मिक भक्तगणांच्या उपस्थितीमध्ये सदरचा कार्यक्रम पार पडला.
नाथबाबा आणि साईबाबांचे महत्त्व कथन
या प्रसंगी श्री विश्वेश्वरनाथ बाबा आणि शिर्डीचे साईबाबा यांचे महत्त्व शर्मा महाराजांनी आपल्या रसाळ वाणीतून श्रोतेगणांना ऐकविले. नाथबाबांच्या कृपेचे अनेक अनुभव सांगताना श्रोत्यांच्या डोळ्यात भक्तीभाव दाटून आला होता.
ग्रामस्थांची मोठी उपस्थिती
सदर प्रसंगी श्री विश्वेश्वर नाथबाबा संस्थान नेवासा बुद्रुकचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर जायगुडे यांच्यासह अनिल पेचे, रामेश्वर कोकणे, संजूबाबा गायकवाड, तानाजी उर्फ बालू फसले, अभिजीत शिंदे, भाऊ जायगुडे, नाना सुरोशे, संदीप भाऊ बोरकर, वेदांत जायगुडे, संकेत गोंजारी, बाळासाहेब शिंदे, लाळगे, विविध भक्तगण आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सन्मान व सत्कार
नेवासा बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने उपमहापौर धनंजय जाधव, ह.भ.प. समाधान महाराज शर्मा, महापौर ज्योती अमोल गाडे, गायक गिरीराज जाधव यांचा सन्मान आणि सत्कार करण्यात आला. नेवासा बुद्रुकच्या मातीतील सुपुत्राने अहिल्यानगरच्या व्यासपीठावर आपल्या गावच्या नाथबाबांना सन्मान मिळवून दिल्याबद्दल ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.





