Pune : सोन्याच्या श्री दत्त मूर्तीचे भाविकांनी घेतले दर्शन

पुणे : सोलापूर रस्त्यावरील बेट केडगाव येथील श्री सद्गुरू नारायण महाराज दत्त संस्थान ट्रस्ट यांचा वतीने श्री दत्ताची साडेतीन किलो वजनाची सोन्याची मूर्ती भाविकांना दर्शनासाठी गुरुवारी खुली करण्यात आली.
श्री दत्त जयंतीच्या अलिकडील गुरुवारी काही तासांसाठी बाजीराव रस्त्यावरील तुळशीबागेतील बॅंक अॉफ महाराष्ट्रच्या शाखेत दर्शनासाठी उपलब्ध करून दिली जाते. या मूर्तीवर हिरे, माणिक, मोती जडवलेले आहेत. कोलकाता येथील वसंत शेठ यांनी ही मूर्ती सन १९१२ मध्ये नारायण महाराजांना दिली होती. ही मूर्ती पूर्वी श्री दत्त जयंती उत्सवकाळात मंदिरात दर्शनासाठी ठेवली जात होती. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव ती बॅंक अॉफ महाराष्ट्रच्या तुळशीबाग शाखेतील लॉकरमध्ये ठेवली जाते.
गेल्या काही वर्षांपासून ती केडगाव येथे नेण्याऐवजी बॅंकेतच दर्शनासाठी ठेवली जाते. येथेच मूर्तीची पूजा अर्जा होते. या गुरूवारीही ही मूर्ती भाविकांना दर्शनासाठी सकाळी दहा दुपारी तीन वाजेपर्यंत बॅंकेत ठेवली होती. यावेळी संस्थानचे प्रमुख विश्वस्त संजय शितोळे, सचिव केदार अगस्ती, खजिनदार विठ्ठल रायरीकर, ह. भ. प. मोरेश्वरबुवा जोशी, हरीष वरळीकर, प्रफुल्ल इनामदार, सुनील बेलसरे, श्रीपाद देशपांडे आदी विश्वस्त उपस्थित होते.




