गुढीपाढव्याच्या शुभ मुहूर्तावर जेजुरीच्या खंडोबाला सोन्याचे ‘जय मल्हार’ नाव भक्ताकडून अर्पण

Jejuri | आज दि. ३० मार्च मराठी नववर्ष आणि गुढीपाढव्याचा दिवस असल्याने अनेकांच्या घरावर गुढी उभारण्यात आल्या आहेत. भारतीय संस्कृतीत चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. या दिवशी नवे संकल्प करुन प्रगतीकडे वाटचाल करण्याचा दिवस मानला जातो. या सणानिमित्ताने मराठी नववर्षांच्या शुभेच्छा दिल्या जातात. या सणादिवशी नवे कपडे घातले जातात. मोठ्या आनंदी वातावरण घरावर गुढी उभारुन पूजा केली जाते. अनेक मंदिरातमध्ये हा सण मोठ्या उत्साही वातावरण साजरा केला जातो.
अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडोबा गडावर गुढीपाढव्याचा सण दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या वर्षीही हिंदू नव वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर श्री खंडोबा देवाच्या एका भक्ताने जय मल्हार हे नाव सोन्यामध्ये अर्पण केले आहे. याची किंमत तब्बल १७ लाख ५१ हजार रुपये आहे. हे नाव श्रींच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये श्री मार्तंड भैरव मूर्तीच्या वरील बाजूस देवसंस्थानचे विश्वस्त ॲड. पांडुरंग थोरवे, मानकरी पुजारी सेवेकरी बापू सातभाई, ऋषिकेश सातभाई, नित्य वारकरी जालिंदर खोमणे, कृष्णा कुदळे यांचे उपस्थितीमध्ये लावण्यात आले.
न्यायाधीशांकडून जय मल्हार सोन्यामधील नाव अर्पण
दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश तेजस कारिया यांनी खंडोबा देवाला जय मल्हार हे सोन्यामध्ये असलेले नाव अर्पण केले आहे. मार्तंड देवसंस्थानचे मुख्य विश्वस्त अभिजित देवकाते यांच्या शुभहस्ते श्री खंडोबा मंदिर मुख्य गाभार्यामध्ये या नावाचे पूजन करुन अनावरण करण्यात आले. यावेळी सर्व विश्वस्त मंडळ, खांदेकरी, मानकरी, ग्रामस्थ व पुजारी सेवेकरी वर्ग उपस्थित होते. तसेच सालाबादप्रमाणे श्री खंडोबा मंदिरामध्ये हिंदू नववर्षानिमित्त श्री खंडोबा देवाची गुढी प्रमुख विश्वस्त व सर्व विश्वस्त मंडळ यांच्या वतीने उभारण्यात आली. यावेळी त्यांच्या हस्ते गुढीची विधीवत पूजा करण्यात आली. यावेळी पुजारी सेवेकरी, अधिकारी कर्मचारी वर्ग यांचे उपस्थिती होते.





