Mahakumbh bus accident : महाकुंभ मेळ्यावरून परतणाऱ्या भाविकांनी भरलेल्या बसचा मध्यप्रदेशातील जबलपूरमधील सिहोराजवळ अपघात झाला आहे. प्रवासी बस समोरून येणाऱ्या एका ट्रकला जोरदार धडकली. या धडकेत ७ भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, अनेक जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. जखमींवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. हा भीषण अपघात आज सकाळी ९:१५ च्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग ३० वर घडला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, प्रवासी वाहनात प्रवास करणारे सर्व भाविक आंध्र प्रदेशचे रहिवासी होते आणि ते कुंभमेळ्यात स्नान करण्यासाठी प्रयागराजला गेले होते. सिहोराच्या मोहला आणि बर्गी गावांमध्ये प्रवासी वाहन येताच त्याचा अपघात झाला. या अपघातात ७ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर काही प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघाताची माहिती मिळताच प्रशासकीय कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरु आहे. जखमींना सिहोरा तहसीलच्या सरकारी रुग्णालयात आणि जबलपूरमधील नेताजी सुभाषचंद्र बोस मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. नेमकं काय घडलं? भाविकांनी भरलेली बस प्रयागराज महाकुंभ मेळ्यातून परतत होती. मोहला आणि बर्गी गावादरम्यान बस पोहोचताच समोरून येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली. सिमेंटनं भरलेला ट्रक चुकीच्या दिशेनं येत होती. त्यामुळे हा अपघात घडला असल्याची माहिती मिळत आहे. बसमध्ये अजूनही काही प्रवासी अडकल्याची माहिती आहे. प्रशासन आणि पोलिसांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुख्यमंत्री यादव यांनी दुःख केले व्यक्त अपघाताबद्दल दुःख व्यक्त करताना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी ‘एक्स’ वर लिहिले की, “जबलपूर जिल्ह्यातील सिहोरा येथे नागपूर-प्रयागराज राष्ट्रीय महामार्गावर प्रयागराजहून परतणाऱ्या एका प्रवासी आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात आंध्र प्रदेश राज्यातील यात्रेकरूंचा अकाली मृत्यू आणि जखमी झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे, सर्व शोकग्रस्त कुटुंबांसोबत माझ्या संवेदना आहेत. ” जिल्हा प्रशासनाला जखमींना योग्य उपचार देण्याचे आणि सर्व मृतांच्या कुटुंबियांशी संपर्क साधून त्यांचे मृतदेह पोहोचवण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मी बाबा महाकाल यांना प्रार्थना करतो की त्यांनी दिवंगत आत्म्यांना त्यांच्या चरणी स्थान द्यावे. या प्रचंड नुकसानातून सावरण्यासाठी आणि जखमींना लवकर बरे होण्यासाठी मी शोकाकुल कुटुंबाला प्रार्थना करतो.