Devoleena Bhattacharjee: देवोलिना भट्टाचार्जीची सायबर सेलकडे धाव…. नेमकं प्रकरण काय आहे?

Devoleena Bhattacharjee: अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी हिने आपल्या सात महिन्यांच्या मुलावर करण्यात आलेल्या वंशविद्वेषपूर्ण आणि अपमानास्पद टिप्पण्यांविरोधात कडक पावले उचलली आहेत. काही दिवसांपूर्वी तिने आपल्या मुलासोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र, त्यानंतर काही युजर्सनी मुलाच्या त्वचेच्या रंगावरून ट्रोल करत खालच्या पातळीवर टिप्पणी केली होती. यावर तीने संताप व्यक्त करत सायबर क्राइम सेलमध्ये अधिकृत तक्रार दाखल केली आहे.
निगेटिव्ह कमेंट्सचे स्क्रीनशॉट्स केले शेअर
देवोलीनाने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर त्या नकारात्मक कमेंट्सचे स्क्रीनशॉट्स शेअर करत ट्रोलर्सच्या कुरुप मानसिकतेचा पर्दाफाश केला. त्या टिप्पण्यांमध्ये तिच्या मुलाविषयी द्वेषयुक्त आणि रंगभेदी भाषा वापरण्यात आली होती. तिने स्पष्ट शब्दांत सांगितले की, “या ट्रोल्सला आता धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे.”
२००० पेक्षा अधिक नकारात्मक कमेंट्सचा दावा
देवोलीनाच्या म्हणण्यानुसार, तिच्या मुलावर २००० हून अधिक नकारात्मक कमेंट्स करण्यात आल्या आहेत. तिने Cyber Crime India च्या अधिकृत अकाऊंटसोबत झालेली चॅट आणि मदतीची विनंती देखील सोशल मीडियावर शेअर केली आहे. याशिवाय, तिने ट्रोल करणाऱ्या काही लोकांसोबतच्या इंस्टा चॅट्सचे स्क्रीन्सहॉट्सही उघड केले आहेत.
ट्रोलिंगप्रकरणी तिने कायदेशीर पावले उचलताना, तिच्या मुलावर प्रेम करणाऱ्या आणि समर्थन करणाऱ्या लोकांचेही आभार मानले. तिने लिहिले, “आता काय बोलावं…८९०० कमेंट्समध्ये जर २००० नकारात्मक मानल्या, तरी ७००० हून अधिक पॉझिटिव्ह कमेंट्स आहेत. माझ्या मुलावर केलेल्या प्रेमासाठी आणि आशीर्वादासाठी मी कृतज्ञ आहे.”
आईंसाठी संदेश: ‘मुलांसाठी मजबूत कवच बना’
तिने पुढे सर्व मातांना उद्देशून लिहिले, “जेव्हा गोष्ट तुमच्या बाळावर येते, तेव्हा त्यासाठी एक मजबूत शील्ड बना.” देवोलीनाने स्पष्ट केलं की, “माझ्या लग्नावरही ट्रोल्सनी टीका केली तेव्हा मी दुर्लक्ष केलं. पण या वेळी त्यांनी एका आईला दुखावलं आहे …आणि हे मी दुर्लक्ष करू शकत नाही.”
देवोलीना भट्टाचार्जीच्या या ठाम भूमिकेचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे आणि अनेक आई-वडील तिच्या पाठीशी उभे आहेत. ट्रोलिंग आणि सायबर बुलींगविरोधातील तिची कारवाई इतरांसाठी प्रेरणादायक ठरत आहे.




