बलात्कार, हत्या प्रकरणी दोषी देवेंद्रला फाशीची शिक्षा; पुन्हा गुन्हा केल्यामुळे सुधारणा शक्य नसल्याचे न्यायालयाचे मत

मुंबई – अल्पवयीन बालिकेचे अपहरण करून बलात्कार आणि हत्या केल्या प्रकरणी मुंबईतील विशेष पोक्सो न्यायालयाने आज 33 वर्षाच्या दोषी व्यक्तीस फाशीची शिक्षा सुनावली. वाडिवेल देवेंद्र असे या आरोपीचे नाव आहे. एप्रिल 2019 मध्ये, विलेपार्ले येथे एक नऊ वर्षांची मुलगी तिच्या घराजवळून बेपत्ता झाल्यानंतर तिचा मृतदेह सेप्टिक टाकीमध्ये सापडला होता.
तिचे अपहरण आणि बलात्कार केल्यानंतर तिची हत्या केल्याच्या आरोपात त्याला दोषी ठरवण्यात आले होते. सीसीटिव्ही फुटेज आणि अन्य पुराव्यांच्या आधारे या हत्येमागे देवेंद्रचा हात असल्याचा दावा पोलिसांनी केला होता. त्याला पोक्सो कायद्यांतर्गत या आठवड्याच्या प्रारंभी दोषी ठरवण्यात आले होते.
हा गुन्हा करण्याच्या केवळ आठ महिन्यांपूर्वी देवेंद्रची तुरुंगातून सुटका झाली होती. 2013 मध्ये याच परिसरात अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात त्याला 7 वर्षांची शिक्षा झाली होती. मात्र 5 वर्षे तुरुंगात काढल्यानंतर त्याची सुटका झाली होती.
देवेंद्र याच्याकडून दुसऱ्यांदा असाच प्रकारचा गुन्हा घडल्यामुळे त्याच्यात सुधारणा सक्य नसल्याचा दावा विशेष सरकारी वकील ऍड. वैभव बागडे यांनी केला होता. मात्र आरोपीविरोधात कोणताही थेट पुरावा उपलब्ध नसल्याचा दावा बचाव पक्षाच्यावतीने करण्यात आला होता. आरोपीच्या वर्तनात सुधारणा सक्य नसल्याचे न्या. एच.सी. शेंडे यांनीही आपल्या निकालपत्रात म्हटले आहे.





