राजकारणात जन्म देणारे देवेंद्र फडणवीस माझे बाप; आमदार रत्नाकर गुट्टेंच्या विधानाची जोरदार चर्चा, थेट भूमिका मांडत म्हणाले…

MLA Ratnakar Gutte : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणचे राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत. निवडणुकीची वेळ जशी जवळ येवू लागली आहे, तशी आता पक्षांकडून मोर्चेबांधणीवर भर दिला जात आहे.
बैठकांचा सिलसिला सुरूच आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी केली जात आहे. अनेक बडे नेते गळाला लावण्याचे काम महायुतीमधील तिनही पक्ष करताना दिसत आहे. माजी मंत्री महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या आमदाराने पक्षापासून राजकीयदृष्या वेगळे होण्याचे संकेत दिले आहेत.
आगामी काळात रासप महायुतीपासून दूर झाल्यास, आपण मात्र भाजप-महायुतीसोबतच राहणार असल्याची स्पष्ट भूमिका परभणीचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी जाहीर केली आहे. त्यांनी व्यक्त केलेल्या निर्णयामुळे परभणी जिल्ह्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. नुकत्याच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आगामी काळातील आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
काय म्हणाले रत्नाकर गुट्टे?
“महादेव जानकर हे माझे नेते आहेत, पण जर ते समजा युतीसोबत नाही आले तर मी निश्चित युतीसोबत राहीन. मी हे अनेकदा म्हणतो की माझ्या आई-वडिलांनी जन्म दिला असला तरी, राजकारणात जन्म देणारे देवेंद्र फडणवीस हे माझे बाप आहेत. त्यांचा जो काही निर्णय असेल तो मला मान्य करावा लागेल आणि तो मी मान्य करेन,” असे विधान रत्नाकर गुट्टे यांनी केले आहे.
मला युतीत राहावं लागेल
मला सत्तेच्या विरोधात जाता येणार नाही. मला विकासाचं राजकारण करायचं आहे. मला जनतेसाठी राजकारण करायचं आहे. मला युतीच्या बाहेर जाता येणार नाही. मला युतीत राहावं लागेल. कारण मला जनतेने निवडून दिलं आहे. मी जनतेला काहीतरी घेणं देणं लागतो. मला त्यांचा विकास करायचा आहे, असेही गुट्टे म्हणाले आहेत.
हेही वाचा : Pune : लक्ष्मीच्या आगमनाने पुणे लखलखले!





