Devendra Fadnavis : …हा तर लवंगी फटाका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्युत्तर

मुंबई : राहुल गांधी यांनी हायड्रोजन बॉम्ब सांगितले होता. हे आता कोणता हायड्रोजन बॉम्ब फोडणार? यामुळे भारत घाबरला होता. पण ते लवंगी फटाका देखील ते फोडू शकलेले नाहीत. फुसका बार त्यांनी लावलेला आहे. मी गेल्यावेळीही सांगितले होते की, राहुल गांधी हे सिरियल लायर आहेत. रोज खोटे बोलत गोबेल्सचे तत्त्व हे मांडायचा प्रयत्न असतो. इतके वेळा निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस दिली, आत्तापर्यंत एकही पुरावा ते देऊ शकले नाहीत, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, राहुल गांधी यांचे एका गोष्टीसाठी मी कौतुक करतो. प्रत्येक वेळी माध्यमांसमोर येऊन खोटे बोलण्याची जी त्यांची हिंमत आहे, हे खरोखरच वाखाण्याजोगी आहे. अशा प्रकारचा नेता यापूर्वी मी कधीच पाहिलेला नाही. ते कितीही खोटे बोलले तरी जनतेचा त्यांच्यावर विश्वास नाही. त्यांना जनतेतच जावे लागेल. जनतेमध्ये जातील तर कदाचित निवडणुकीचे निकाल कधीतरी त्यांच्या बाजूने येतील. पण, अशाच प्रकारे खोटे बोलत राहिले आणि आपल्या मनाचे तसेच आपल्या कार्यकर्त्यांचे समाधान करत राहिले तर कधीच त्यांच्या बाजूने निकाल येऊ शकत नाही.
महाराष्ट्रातील पराभव हा त्यांच्या जिव्हारी लागलेला आहे. त्यांना महाराष्ट्रातून फार अपेक्षा होती. तुम्हाला माहीत आहे की त्यांनी हॉटेल देखील बूक करून ठेवले होते. त्यांनी मंत्रिमंडळाची रचना देखील केली होती. कॉंग्रेसमध्ये अनेक मुख्यमंत्रीसुद्धा तयार होऊन गेले होते आणि अशातच जनतेने त्यांना जो झटका दिला होता, त्यातून ते सावरू शकत नाही. हा झटका एवढा मोठा होता. पण, त्यांनी महाराष्ट्राच्या संदर्भात केलेली सगळी विधाने खोटी निघाली. सगळी विधाने ही पुराव्याशिवाय केलेली होती. याचे पुरावे निवडणू आयोगाने दिल्यामुळे ते तोंडावर आपटले आहेत, असे म्हणत त्यांनी निशाणा साधला.





