खळबळजनक! ‘आरोग्य मिशन’मध्ये 400 कोटीचा घोटाळा – फडणवीसांचा पुराव्यांसहित आरोप

मुंबई – केंद्र सरकारकडून प्राप्त होत असलेल्या निधीतून राष्ट्रीय आरोग्य मिशनची राज्याकडून अमलबजावणी होत असताना, सेवेत कायम नियुक्त्या देण्याच्या नावाखाली सुमारे 400 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार होत असल्याबाबत माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पुराव्यांसहित पत्र पाठवले आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
‘माजी मुख्यमंत्री यांनी पत्रात म्हटले आहे की, राष्ट्रीय आरोग्य मिशन ही केंद्र सरकारची योजना, केंद्राच्या निधीतून पण, राज्य सरकारमार्फत त्याची अमलबजावणी केली जाते. त्यामुळे उमेदवारांच्या नियुक्त्यांची प्रक्रिया ही राज्य सरकारमार्फतच होते. या योजनेच्या कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्यांना सेवेत कायम नियुक्त्या देण्यासंदर्भात काही विधाने मंत्र्यांकडून आल्यानंतर, कायमस्परूपी नियुक्त्यांसाठी संपूर्ण राज्यात आर्थिक देवाणघेवाणीला प्रचंड वेग आला आहे. त्या या पत्रासोबत जोडत आहे. त्यातून संपूर्ण स्थितीची कल्पना आपल्याला यावी.
या ऑडिओ क्लिपमधील संवादानुसार, सुमारे 20 हजार असे उमेदवार राज्यात असून, त्यांना सेवेत कायम करण्यासाठी, त्यांच्याकडून 1 ते 2.50 लाख रूपये गोळा केले जात आहेत. म्हणजेच यासाठी सुमारे 300 ते 400 कोटी रुपयांचे कलेक्शन होते आहे. हे साहे कुणाच्या आशीर्वादाने होत आहे, याचीही सखोल चौकशी करणे गरजेचे आहे. सेवेत कायम करण्यासाठी सुमारे 400 कोटींची उलाढाल महाराष्ट्रात होत असेल तर ते अतिशय गंभीर आहे.
प्रत्यक्षात उमेदवारांकडून 1 रूपयांचे सहमतीचे सहमतीपत्र आणि 500 रूपये लढा निधी असे संकलन करीत अर्जावर स्वाक्षरी घेतली जाते आणि सोबत 1 ते 2 लाख रूपयांदरम्यान रोख असलेला लिफाफा वेगळा देण्यास सांगितला जात आहे. या संवादात अनेक लोकांची नावेही असून, ती येथे नमूद करीत नाही. सोबतच्या ऑडिओ क्लिपमध्ये ती आपल्याला ऐकता येतील. हा पैसा देण्यासाठी अनेकांनी कर्ज घेतले आणि त्यांनी ते पैसा जमा केला. पण, आता त्यांना केवळ व्याज भरावे लागत आहे. काही लोक एकमेकांना बॅंकेतून पैसे काढून रोख हातात ठेवा, केंव्हाही भरावे लागतील, असे सांगत आहेत.
काही खास बॅंक खाती सुद्धा यासाठी उघडली गेली आहेत. हा संपूर्णच प्रकार अतिशय गंभीर असून, केवळ एका अभियानात सेवेतील कायम नियुक्तीसाठी अशापद्धतीने 400 कोटींचा भ्रष्टाचार होत असेल, तर कोरोनाच्या कालखंडात आणि तेही आरोग्यच श्रेत्रात किती मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होतोय, याची कल्पनाही न केलेली बरी. या ऑडिओ फितींची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि सरकारमधील कुणाच्या आशीर्वादाने हा प्रकार होतोय, याचीही सखोल चौकशी करण्यात यावी,’ असे पत्र देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.





