फोन टॅपिंग प्रकरणी देवेंद्र फडणवीसांच्या अडचणी वाढणार

राज्य सरकारकडून दोन सदस्यीय समिती स्थापन
मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यात फोन टॅपिंग प्रकरणाने राज्यात एकच वादळ निर्माण केले आहे. दरम्यान, याच प्रकरणी आता देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे दिसत आहे. कारण राज्यातील महाविकास आघाडी सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. फोन टॅपिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने दोन सदस्यीय समिती गठीत केली आहे.
राज्य सरकारकडून गठित करण्यात आलेल्या या समितीमध्ये अतिरिक्त मुख्य सचिव श्रीकांत सिंह आणि राज्य गुप्तचर विभागाचे सहआयुक्त अमितेश सिंह यांचा या समितीमध्ये समावेश आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांचे फोन टॅप झाल्याचा आरोप तत्कालीन फडणवीस सरकारवर करण्यात आला आहे. या प्रकरणाची ही दोन सदस्यीय समिती तपास करणार आहे. सत्तास्थापनेच्या नाट्यादरम्यान शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यासह कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोन टॅप करण्यात आले, असा आरोप करण्यात आला होता. कॉंग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनी फोन टॅपिंगचा आरोप केला होता. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले होते.
राजकीय विरोधकांचे फोन टॅप करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. राज्य सरकारने तसे कुठलेही आदेश दिले नव्हते. सत्य महाराष्ट्राच्या जनतेला माहित आहे. शिवसेनेचे मंत्री सुद्धा त्या काळात गृहराज्यमंत्री होते. माझी एकच विनंती आहे की, तत्काळ चौकशी करुन त्याचा अहवाल राज्याच्या जनतेपुढे ठेवावा. इस्त्रायलला जाऊन चौकशी करायची असेल तर तीही करावी, असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. दरम्यान, सरकारच्या या निर्णयामुळे भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणी वाढणार का हे पाहणे आता गरजेचे आहे.





