Devendra Fadnavis : शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड! ५ हजार खात्यात जमा होणार असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती
Devendra Fadnavis : शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी, या उद्देशाने अग्रीम रक्कम देण्याचा निर्णय

Devendra Fadnavis : राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता, शेतकऱ्यांना अग्रीम मदत म्हणून सरकारकडून ५ हजार रूपये दिले जाणार आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत दुष्काळाच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत, दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांसमोर अनेक आर्थिक आव्हाने उभी राहिली आहेत. अशा परिस्थितीत दिवाळीचा सण साजरा करताना शेतकऱ्यांना पैशांची अडचण जाणवू शकते. ही बाब लक्षात घेऊन दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात आर्थिक मदत जमा करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
“राज्यावर दुष्काळाची भीषण छाया असून, पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पशुधन सांभाळणे देखील कठीण झाले आहे. दुष्काळाशी संबंधित मदतीची संपूर्ण कार्यप्रणाली दिवाळीपूर्वी पूर्ण करणे शक्य होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी, या उद्देशाने अग्रीम रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिवाळीआधी 5 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील. शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. सरकार बळीराजाच्या पाठीशी आहे,” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
“मराठवाड्यात पाण्याची पातळी ३ मीटरपेक्षा खाली गेली आहे. त्यामुळे ऑक्टोबर नोव्हेंबरपासून पाण्याचे टँकर दिले जातील. त्याचे GPS ट्रॅकिंग होईल आणि १६ हजार बेकायदेशीर पाण्याचे कनेक्शन ज्यांनी घेतले, त्यांचे पाण्याचे कनेक्शन कापण्यात आले आहेत. हा निर्णय थोडा कठोर असला तरी पिण्याचे पाणी राखून ठेवणं गरजेचे आहे,” असे फडणविसांनी सांगितले.
हेही वाचा:
Box office release : बॉक्स ऑफिसवर महाक्लॅश ! एकाच दिवशी ‘इतके’ चित्रपट होणार रिलीज; जाणून घ्या…





