Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांची उदय सामंतांना मोठी ऑफर; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे 'सहकार गौरव पुरस्कार' सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेणारी एक अत्यंत रंजक घडामोड घडली.

Devendra Fadnavis : आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ‘सहकार गौरव पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेणारी एक अत्यंत रंजक घडामोड घडली. व्यासपीठावरून बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्योगमंत्री तथा शिवसेना नेते उदय सामंत यांना थेट सहकार मंत्रिपदाची ऑफर देऊन टाकली.
मुख्यमंत्र्यांनी (Devendra Fadnavis) टाकलेल्या या अनपेक्षित गुगलीमुळे संपूर्ण सभागृहात एकच हशा पिकला असला, तरी या विधानामुळे आगामी मंत्रिमंडळ विस्ताराच्या आणि फेरबदलाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात उदय सामंत यांच्याबाबत पुन्हा एकदा जोरदार चर्चा रंगली आहे.
या कार्यक्रमात सुरुवातीला बोलताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सहकार क्षेत्रात काम करण्याची आपली इच्छा बोलून दाखवली होती. येत्या काही दिवसांत रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक होणार असल्याने आपल्यालाही आता सहकार क्षेत्रात यावेसे वाटत आहे, असे सांगत सामंत यांनी व्यासपीठावर उपस्थित असलेले भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्याकडे मिश्किलपणे आशीर्वाद मागितले.
भाषणांमधून नेहमी ‘सहकारात राजकारण नसावे’ असे सर्रासपणे सांगितले जाते, पण प्रत्यक्षात तिथे राजकारण असते की नाही हे मला ठाऊक नाही, कारण कोकणात सहकार क्षेत्र अद्याप एवढे वाढलेले नाही, असेही उदय सामंत यांनी नमूद केले.
उदय सामंत यांच्या याच भाषणाचा धागा पकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपल्या भाषणात त्यांना थेट सहकार मंत्रिपदाची ऑफर देऊन टाकली. कोकणात सहकार वाढला नसल्याचा सामंत यांचा दावा खोडून काढत फडणवीस म्हणाले की, राज्यातील पहिली ग्रामीण पतपेढी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे सुरू झाली होती. त्यामुळे सहकाराची खरी सुरुवातच मुळात कोकणातून झाली असून त्या ठिकाणी कामासाठी खूप चांगली संधी आहे, त्यामुळे तुम्ही काहीही काळजी करू नका.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, तुम्ही उद्योगमंत्री म्हणून सध्या चांगले काम करतच आहात. परंतु, तुमची ही नवीन इच्छा बघता, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलून तुम्हाला सहकार विभागच देऊन टाकावा, असा विचार सध्या माझ्या डोक्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या गुगलीने कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्यांमध्ये प्रचंड हशा पिकवला. मात्र या ऑफरमुळे राजकीय गोटात वेगळ्याच चर्चा सुरू झाल्या आहेत.
या संपूर्ण प्रसंगामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) आणखी एक महत्त्वाचे खाते जाणार का, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर, अर्थसंकल्प तोंडावर आल्यामुळे अर्थमंत्रिपदाची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. मात्र, हे पद पुन्हा राष्ट्रवादीला देण्याबाबत फडणवीस हे दिल्लीतील वरिष्ठांकडे बोट दाखवत आहेत. अशातच आता सहकार विभागाबाबत फडणवीस यांनी थेट भाष्य केल्याने, आगामी मंत्रिमंडळ फेरबदलात भाजप हे खातेही राष्ट्रवादीकडून काढून घेणार का, अशी शंका उपस्थित केली जात आहे.






