उध्दव ठाकरेंनी फडणवीसांसोबत चर्चेची सगळी दारं बंद केली होती; रामदास कदम यांचा खळबळजनक दावा

मुंबई : राज्यात सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करताना दिसत आहेत. यादरम्यान शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार रामदास कदम यांनी खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी केलेल्या दाव्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
काय म्हणाले रामदास कदम?
भाजप आणि शिवसेना युतीच्या चर्चेसाठी देवेंद्र फडणवीस यांनी उध्दव ठाकरे यांना सतत फोन करत होते. मात्र काँग्रेससोबत जाण्यासाठी उध्दव ठाकरे यांनी चर्चेची सगळी दारं बंद केली होती. उध्दव ठाकरे हे अमित शाह यांच्यासोबत बोलले असते तर उध्दव ठाकरे अडीच वर्षे मुख्यमंत्री झाले असते. मात्र अनेक फोन करूनही उध्दव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना प्रतिसाद दिला नाही. या सर्व घटनांचा मी स्वतः साक्षीदार आहे असा खळबळजनक दावा रामदास कदम यांनी केला आहे.
रामदास कदमांनी विश्वास केला व्यक्त
जम्मू काश्मीर आणि हरियाणामध्ये जे निकाल आले यावर बोलताना रामदास कदम यांच्याकडून भाजपचे अभिनंदन करण्यात आले. जिथे भारताचा झेंडा लावणं मुश्किल होतं तिथे आज भाजपने विजय मिळवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासाला आणि त्यांनी बघितलेल्या विकसित भारताच्या संकल्पानेला तिथल्या जानेतेने साथ दिली आहे. किंबहुना आगामी काळात असाच विजय आमचा देखील महाराष्ट्रात निश्चित असल्याचा विश्वास रामदास कदम यांनी यावेळी व्यक्त केला.





