बीड प्रकरण: ‘धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का?’ फडणवीस म्हणाले…

Devendra Fadnavis on Dhananjay Munde: बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून खून करण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणानंतर वाल्मिक कराड चर्चेत आले होते. ते अखेर 22 दिवसांनंतर पुण्यात सीआयडीला शरण आले.
या हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर आरोप केले जात आहेत. या घटनेनंतर धनंजय मुंडे यांच्यावर देखील विरोधकांकडून निशाणा साधला जात असून, त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जात आहे. आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया दिली.
धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार का? या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, मला या प्रकरणातील राजकारणात जायचे नाही. मी आधीपासून सांगत आलो आहे की, जे पुरावे समोर येतील त्यानुसार कारवाई केली जाईल. माझ्याकरिता स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येला कारणीभूत लोकांना शिक्षा होणे हे महत्त्वाचे आहे.
ते पुढे म्हणाले की, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रत्येक आरोपीवर कडक कारवाई करण्यात येईल, कुणालाही अशाप्रकारची हिंसा करण्याचा अधिकार नाही. सर्व दोषी जोपर्यंत फासावर लटकत नाहीत, तोपर्यंतची सर्व कारवाई पोलीस करतील.
संतोष देशमुख यांच्या बंधूशी फोनवर बोलणे झाले आहे. त्यांना सांगितले आहे की, तुम्ही काही काळजी करु नका. या प्रकरणातील कोणत्याही आरोपीला सोडणार नाही. या प्रकरणी ३०२चा गुन्हा दाखल होणार का? ते पोलीस बघतील. पुराव्यांच्या आधारे पोलीस निर्णय घेतील. सीआयडीला स्वायतत्ता दिली आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना शोधून काढले जाईल, असेही त्यांनी बोलताना स्पष्ट केले.
दरम्यान, वाल्मिक कराड पुण्यात सीआयडीला शरण आले. त्यानंतर त्यांना केज न्यायालयात दाखल करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची सीआयडी कस्टडी देण्याचा निर्णय दिला आहे.





