मुंबई : राज्यातील वनाच्छादनाची टक्केवारी वाढविण्यासाठी हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र या अभियानाअंतर्गत यावर्षी राज्यात १० कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली. पुढील वर्षीही १० कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे. वृक्षारोपण ही लोकचळवळ झाली तरच ही मोहीम यशस्वी होईल. त्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, वन मंत्री गणेश नाईक, राज्यमंत्री आशिष जयस्वाल आदी उपस्थित होते. हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र अभियानांतर्गत वृक्ष लागवड मोहिमेसंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. राज्यातील ३३ टक्के वनाच्छादनाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी पुढील २० वर्षे हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र हे अभियान मोहीम स्वरूपात राबविणे आवश्यक आहे. महाराष्ट्राने गेल्या आठ वर्षांत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली आहे. यापूर्वी ३३ कोटी आणि ५० कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट यशस्वीपणे गाठले आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षीचे उद्दिष्ट नक्कीच पूर्ण करता येईल. वृक्षारोपणात किमान दीड ते तीन वर्षे वयाची रोपे लावण्यात यावीत. लावलेली झाडे टिकतील, वाढतील यासाठी प्रयत्न व्हावेत. तसेच लावलेल्या वृक्षारोपणाची जगण्याची टक्केवारी वाढावी, यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. तसेच यासाठी रिमोट सेन्सिंग, उपग्रह आदी साधनांचाही वापर करून पारदर्शकपणे कामे होण्याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना फडणवीस यांनी दिल्या. वन विभागाकडे जबाबदारी राज्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग तसेच पालखी मार्गाच्या कडेला वृक्षारोपण करण्याच्या कामाची जबाबदारी आता वन विभागाकडे सोपविण्यात येईल. त्याचप्रमाणे गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहेत. त्यामुळे या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड होणे आवश्यक आहे. त्यासाठी पुढील वर्षी गडचिरोली जिल्ह्यात १ कोटी झाडे लावण्याचा विचार असून लवकरच त्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. याशिवाय जोतिबाच्या डोंगरावरही मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.