22 व्या वर्षी सर्वात तरुण नगरसेवक, 44 व्या वर्षी महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री…जाणून घ्या देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय प्रवास

‘मेरा पानी उतरा देखकर मेरे किनारे घर मत बसा लेना,
मैं समंदर हूं लौटकर वापस जरूर आऊंगा..’
Devendra Fadnavis । 2019 च्या निवडणुकीतील पराभव आणि विरोधकांच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंना इशारा देताना देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं होतं. त्याच वक्तव्याला पूर्णत्वाकडे घेऊन जात ते पुन्हा आले आहेत. भाजपने त्यांच्याकडे तिसऱ्यांदा राज्याची कमान सोपवली आहे. प्रदीर्घ राजकीय गदारोळानंतर भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय प्रवासावर एक नजर टाकूया.
सध्या देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील भाजपचा सर्वात मजबूत चेहरा तर आहेतच पण राज्याच्या राजकारणातही त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. 2014 मध्ये ते पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून निवडून आले आणि 1972 मध्ये वसंतराव नाईक यांच्यानंतर त्यांचा पूर्ण कार्यकाळ पूर्ण करणारे ते पहिले मुख्यमंत्री बनले.
राज्याच्या ५९ वर्षांच्या इतिहासात पूर्ण कालावधीनंतर पुन्हा सत्ता मिळवणारे पहिले बिगर काँग्रेस मुख्यमंत्री बनून देवेंद्र फडणवीस यांनी इतिहास रचला. नितीन गडकरी, एकनाथ खडसे यांच्यासारख्या नेत्यांकडे दुर्लक्ष करून पक्ष नेतृत्वाने त्यांची निवड केली तेव्हाच देवेंद्र फडणवीस हे तगडे नेते मानले गेले होते.
कोण आहेत देवेंद्र फडणवीस? Devendra Fadnavis ।
देवेंद्र गंगाधरराव फडणवीस हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. ते 2014 ते 2019 पर्यंत महाराष्ट्राचे 18 वे मुख्यमंत्री होते आणि वयाच्या 44 व्या वर्षी राज्याचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले. फडणवीस यांचा जन्म 22 जुलै 1970 रोजी गंगाधरराव आणि सरिता फडणवीस यांच्या पोटी झाला. त्यांनी कायद्याची पदवी घेतली आणि 1998 मध्ये जर्मनीच्या डहलम स्कूल ऑफ एज्युकेशनमधून बिझनेस मॅनेजमेंट आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा पूर्ण केला. 2006 मध्ये अमृता फडणवीस यांच्याशी लग्न केले आणि दोघांना एक मुलगी आहे.
आरएसएसमधून राजकीय प्रवास सुरू Devendra Fadnavis ।
* देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय प्रवास राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) पासून सुरू झाला आणि 1990 च्या दशकात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत (ABVP) सामील झाले. 1992 मध्ये, त्यांनी नागपूरच्या राम नगर प्रभागातून पहिली महापालिका निवडणूक जिंकली आणि वयाच्या 22 व्या वर्षी ते सर्वात तरुण नगरसेवक बनले.
* 1997 मध्ये, फडणवीस नागपूर महानगरपालिकेचे सर्वात तरुण महापौर आणि भारतातील दुसरे सर्वात तरुण महापौर बनले. 1999 ते 2004 पर्यंत सलग तीन वेळा त्यांनी महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून काम केले.
* 2001 मध्ये, फडणवीस यांची भारतीय जनता युवा मोर्चा (BJYM) चे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. 2010 मध्ये भाजपच्या महाराष्ट्र युनिटचे सरचिटणीस झाले आणि 2013 मध्ये त्यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली. 2019 मध्ये नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून पुन्हा निवडून आले. मात्र यावेळी जनतेने शिवसेना -भाजपच्या युतीला निवडून दिल्यानंतर शिवसेनेने वेगळी वाट धरली.त्यामुळे त्यावेळी त्यांचे मुख्यमंत्रीपद हुकले.
* मात्र 2019 मध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याशी युती केली परंतु केवळ 80 तासांतच ही युती तुलटल्याने त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राजय महाविकास आघाडीने सरकार स्थापन झाले त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. यानंतर भाजपने एकनाथ शिंदे यांच्यासोबत सरकार स्थापन केले, ज्यात नंतर अजित पवार सामील झाले आणि या आघाडी सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री पदावर काम करत होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा त्यांच्या नावावर मुख्यमंत्रीपदासाठी शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.





