“फडणवीसांना माझा गेम करायचा होता त्यामुळे..” नितीन देशमुखांचा गंभीर आरोप

नवी दिल्ली – राज्यातील सत्तासंघर्षावेळी मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरतला गेलो होतो. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी माझा गेम करण्यासाठीचे षडयंत्र रचले होते. सुरतमध्येच माझा घात करण्याचा भाजपचा डाव होता, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी केला. तसेच शिंदे गटातील एका आमदारानेच मला ही माहिती दिली, असा खुलासाही त्यांनी केला.
अकोला येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. देवेंद्र फडणवीसांनी या गोष्टी करताना विचार करायला पाहिजे. आम्ही मरणाला न घाबरणारी माणसे आहोत, असेही त्यांनी म्हटले.नितीन देशमुख म्हणाले, शिंदे गटासोबत सत्तास्थापन करण्याच्या प्लॅनमध्ये मी अडथळा ठरत असल्याने फडणवीस यांना माझा गेम करायचा होता. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी सुरतमध्ये असताना मला हृदयविकाराचा झटका आल्याची खोटी बातमी प्रसारमाध्यमांना दिली, असा दावाही त्यांनी केला.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत शिवसेनेच्या आमदारांचा जो एक गट गेला होता, त्यामध्ये नितीन देशमुख यांचा समावेश होता. मात्र, सुरतमध्ये नितीन देशमुख यांची प्रकृती अचानक बिघडल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यांच्या छातीत वेदना होत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. त्यावेळी नितीन देशमुख यांच्या पत्नीने ते बेपत्ता असल्याची तक्रारही पोलिसांकडे दिली होती.
काही दिवसांनी नितीन देशमुख महाराष्ट्रात परतले होते. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे आणि भाजपवर आरोप केले होते. मी उद्धव ठाकरे यांची साथ सोडायला तयार नसल्याने सुरतमध्येच माझा घात करण्याचा भाजपचा डाव होता. रुग्णालयात मला चुकीच्या पद्धतीने इंजेक्शन टोचण्यात आले. माझ्या मागे पोलीस लावण्यात आले. तसेच डॉक्टरांच्या मदतीने मला ठार मारण्याचा कट रचण्यात आला होता, असे आरोप नितीन देशमुख यांनी केले होते.





