Devendra Fadanvis : राज -उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे बंधू, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 20-25 मिनिटे सौहार्दपूर्ण वातावरणात चर्चा झाली. राज ठाकरे यांच्या भेटीमुळे आपला आनंद दुप्पट झाल्याची भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. या भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली.
मुख्यमंत्री फडणवीस सध्या नागपूर दौऱ्यावर असून, महामेट्रोच्या कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना ठाकरे बंधूंची भेट, उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस, नागपूर महामेट्रो, वाहतूक कोंडी, तसेच मंत्री संजय शिरसाट आणि राज्यमंत्री मिसाळ यांच्यातील वाद याबाबत प्रश्न विचारले.
ठाकरे बंधूंच्या भेटीवर फडणवीस यांचे मत
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन शुभेच्छा दिल्याबाबत विचारले असता, फडणवीस म्हणाले, “वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर गेले असतील, तर त्यात राजकारण कशाला आणायचे? अशा गोष्टींमध्ये राजकारण पाहू नये. आमच्याकडूनही उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा आहेत.” उद्धव ठाकरे यांनी “महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होईल” असे विधान केले होते, यावर फडणवीस यांनी टोला लगावताना म्हटले, “महाराष्ट्राच्या मनात काय आहे, ते विधानसभा निवडणुकीत दिसले आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही दिसेल. एखाद्या पक्षाच्या नेत्यांच्या मनात जे आहे, ते संपूर्ण राज्याच्या मनात आहे, असे म्हणणे खूप मोठे विधान ठरेल.”
मंत्री-राज्यमंत्र्यांमधील वादावर स्पष्टीकरण
मंत्री संजय शिरसाट आणि राज्यमंत्री मिसाळ यांच्यातील वादाबाबत फडणवीस म्हणाले, “पत्र लिहून वाद निर्माण करू नयेत. वाद असल्यास मला भेटून किंवा बोलून तो सोडवावा. मंत्री आणि राज्यमंत्री हे एकाच सरकारचे भाग आहेत. मंत्र्यांनी दिलेले अधिकार राज्यमंत्री वापरतात. मात्र, राज्यमंत्र्यांना बैठका घेण्याचा अधिकार नाही, असे नाही. धोरणात्मक निर्णय घेताना त्यांनी कॅबिनेट मंत्र्यांशी चर्चा करणे आवश्यक आहे. दोघांनीही संवाद साधून सामंजस्य दाखवावे.”
एकनाथ खडसे यांच्या जावयाच्या अटकेवर काय म्हणाले?
पुण्यातील रेव्ह पार्टीप्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई खेवलकर यांना अटक झाल्याबाबत फडणवीस यांना विचारले असता, त्यांनी सांगितले, “याबाबत मी माध्यमांमधून माहिती पाहिली आहे, पण सविस्तर माहिती घेतलेली नाही. पोलिसांनी रेव्ह पार्टीवर छापा टाकल्याची प्राथमिक माहिती आहे. पूर्ण माहिती घेतल्यानंतर यावर अधिक बोलू.”





