Devendra Fadanvis : कायदेशीर प्रक्रिया टाळून कार्यवाही करता येणार नाही; फडणवीसांनी केले स्पष्ट

मुंबई : हैदराबाद गॅझेटसंदर्भात आम्ही न्या. संदीप शिंदे यांची समिती तयार केली आहे. मुदत देणे न देण्याच्या येथे प्रश्न येत नाही. आपण तयार केलेल्या शिंदे समितीमुळे मराठा समाजातील कुटुंबांच्या कुणबी नोंदी सापडल्या. त्यातून आपण सदर कुटुंबांना कुणबी जातप्रमाणपत्रे दिली. आपण हैदराबाद गॅझेटचे काम या समितीकडे दिले आहे. त्याच संदीप शिंदे यांनी मनोज जरांगे यांना भेटून सांगितले की यात काही बदल करायचे आहे.
त्यासाठी वेळ लागेल. मात्र, मनोज जरांगे यांचे म्हणणे आहे की आत्ताच द्या, येथे मुंबईतच आरक्षण द्या. परंतु, त्यासंदर्भात ज्या कायदेशीर प्रक्रिया आहेत त्या पार न पाडता पुढील कार्यवाही करून कसे चालेल, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. फडणवीस म्हणाले, संदीप शिंदे यांनी मनोज जरांगे यांना माहिती दिली. प्रक्रिया करावी लागेल असे सांगितले. याबाबत शेवटी चर्चेतून मार्ग निघू शकतो. परंतु, आडमुठ्या भूमिकेतून तोडगा निघणार नाही. सरकार हे कायद्याने चालते. सरकार कायदेशीर मार्गाने सर्व प्रश्न सोडवेल. कायद्यात ज्या तरतुदी आहेत त्या सगळ्यांचा वापर करून आपण प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
मनोज जरांगे ज्या मागण्या करत आहेत त्याच्याकडे आम्ही सकारात्मकने पाहात आहे. ते मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करावा अशी मागणी केली जात आहे. पण न्यायालयाचे काही निर्णय आलेले आहेत. या निर्णयांचा आपल्याला अवमान करता येणार नाही. कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन अशी मागणी केली जात असेल आणि लोकांना खुश करण्यासाठी तसा निर्णय सरकराने घेतलाच तर तो एकही दिवस टिकणार नाही, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.





