पुणे जिल्हा | पाच वर्षांत पाच हजार कोटींची विकासकामे केली

राजगुरुनगर, (प्रतिनिधी) – माझ्या राजकीय जीवनात खेळाला प्रोत्साहन देण्याचे काम केले. त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये आणले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून खेड तालुक्याच्या विकासासाठी पाच वर्षांत पाच हजार कोटींपेक्षा जास्त निधीची विकासकामे झाली त्यातून जनसुविधा उपलब्ध केल्या, असा दावा आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केला.
राजगुरुनगर येथील तिन्हेवाडी गावाच्या हद्दीत असलेल्या हुतात्मा राजगुरू तालुका क्रीडा संकुलात नव्याने 6 कोटी 19 लाख रुपये खर्चून बांधण्यात येणार्या जलतरण तलावाचे भूमिपूजन आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँगेस तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा महिला उपाध्यक्षा कांचन ढमाले, जि. प. माजी सदस्या मंगल चांभारे, खेड बाजार समिती माजी सभापती शांताराम चव्हाण, विलास कातोरे, विनायक घुमटकर, संचालक जयसिंग भोगाडे, पप्पू टोपे, रणजित गाडे,
तालुका महिला अध्यक्षा संध्या जाधव, माजी सभापती सुरेश शिंदे, वैशाली जाधव, मनीषा टाकळकर, नंदा कड, लता गोपाळे, वैभव घुमटकर, वैभव नाईकरे, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, तालुका क्रीडा प्रकाश मोहरे,
तिन्हेवाडीच्या माजी सरपंच कविता पाचारणे, विद्यमान सरपंच प्रतीक्षा पाचारणे, उपसरपंच रंगनाथ आरुडे, यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, तालुक्यातील क्रीडा शिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होते.
आमदार मोहिते म्हणाले, खेड तालुक्याला वरदान असलेले येथील हुतात्मा राहजगुरू तालूका क्रीडा संकुल आहे. क्रीडा विभागाने क्रीडा संकुल समिती स्थापन करून त्यात स्थानिक नागरिकांचा समावेश केला तर क्रीडा संकुल परिसर सुव्यवस्थीत राहील.
काही स्थानिक पातळीवर सुधारणा केल्या जातील. मंत्री संजय बनसोडे यांना भेटून एखादे काम द्या त्यांनी तात्कळ मान्यता देत 6 कोटी 19 लाख रुपये जलतरण तलावाला मंजूर केले. क्रीडा संकुलात इनडोअर गेमसाठी मोठे शेड उभे करणार आहोत.
नगर विकास विभागाकडून निधी मंजूर झाला आहे. कबड्डी, खो-खो आदी स्पर्धा त्यात होतील. येथे एकच हॉल आहे त्यात निवडणुकीच्या पेट्या ठेवल्या जातात. महसूल विभागाला कायमस्वरूपी वाकी येथे मोठा हॉल बांधून दिला जाणार आहेत.
तालुक्यात प्रत्येक क्षेत्रात काम करण्याची संधी मला मिळाली आहे. जो नेता एवढा निधी देतो त्याच्या मागे आपण उभे राहणे ही आपली जबाबदारी आहे.
अजित पवार काम करणारे नेते आहेत त्यांच्या मागे आपण उभे राहावे. तालुक्याचे नेतृत्व करण्याची संधी तालुक्यातील जनतेने मला संधी द्यावी असे आवाहन केले.
ही विकास कामे मंजूर
आचार संहिता लागू होण्यापूर्वी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी प्रयत्न करून 526 कोटी रुपयांची विकास कामे मंजूर करून घेतली आहेत यामध्ये 8 गावांतील कोल्हापूर पद्धतीच्या बंधारे दुरुस्तीसाठी (19.30 कोटी रुपये), आपत्ती व्यवस्थापन विकास व जिल्हा वार्षिक नियोजन यांच्या माध्यमातून भोमाळे,
शिरोली, पदरवाडी (भोरगिरी), राक्षेवाडी (चाकण), भामचंद्र डोंगर, आंबेठाण (23.64 कोटी रुपये), पीएमआरडीए अंतर्गत रस्ते विकास कामे (295 कोटी रुपये), चाकण एमआयडीसी अंतर्गत गावांच्या विकास कामांसाठी (189 कोटी रुपये) असा एकूण 526 कोटी रुपये निधी आचार संहिता लागण्यापूर्वी मंजूर केला आहे.
तालुक्यातील 4 देवस्थानाला ’क’ दर्जा
खेड तालुक्यातील 10 तीर्थक्षेत्राचे प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठवण्यात आले होते त्यापैकी गडदुबाई (वाडा), वाळकेश्वर (वाकळवाडी), भानोबा (कोयाळी), अंबिका माता (साबळेवाडी) या गावातील देवस्थानाला ’क’ दर्जा मिळाला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रस्तावावर सह्या केल्या आहेत ही तालुक्यासाठी खूशखबर असल्याचे आमदार मोहिते पाटील यांनी सांगितले.
सरकारने राज्यातील क्रीडा संकुलाबाबत धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. आमदार मोहिते पाटील यांनी हुतात्मा राजगुरू क्रीडा संकुलमध्ये स्विमिंग पूल बांधण्यासाठी दुसरा निर्णय घेत त्यासाठी सरकारकडून 6 कोटी 19 लाख निधी मंजूर करून घेतला.
25 बाय 21 मीटर इनडोअर जलतरण तलाव होणार आहे. त्याचे काम दर्जेदार काम होईल. पुणे जिल्ह्यातील हे पहिले काम होत आहे.-महादेव कसगावडे, जिल्हा क्रीडा अधिकारी





