Devdutt Padikkal : सचिन-धवनला मागे टाकत देवदत्त पडिक्कलचा नवा विक्रम; गॉल कसोटीत ऐतिहासिक खेळी!
गॉलच्या मैदानावर सुरू असलेल्या या रोमांचक लढतीत युवा फलंदाज देवदत्त पडिक्कलने (Devdutt Padikkal) आपल्या बॅटने नवा इतिहास रचत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Devdutt Padikkal : भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारतीय खेळाडूंनी दमदार वर्चस्व गाजवले आहे. गॉलच्या मैदानावर सुरू असलेल्या या रोमांचक लढतीत युवा फलंदाज देवदत्त पडिक्कलने (Devdutt Padikkal) आपल्या बॅटने नवा इतिहास रचत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
अनपेक्षितपणे मिळालेल्या संधीचे सोने करत त्याने श्रीलंकेच्या भूमीवर अनेक दिग्गज भारतीय फलंदाजांना मागे टाकत एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. या दौऱ्यासाठी तिसऱ्या क्रमांकासाठी साई सुदर्शनची पहिली पसंती होती, मात्र तो पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याने देवदत्त पडिक्कलला (Devdutt Padikkal) अंतिम अकरामध्ये खेळण्याची सुवर्णसंधी मिळाली.
या संधीचा पूर्ण फायदा उठवत पडिक्कलने पहिल्या डावात १६७ धावांची दिमाखदार शतकी खेळी साकारली. दुसऱ्या डावातही त्याने आत्मविश्वासू सुरुवात केली होती, मात्र ४४ धावांवर त्याची खेळी संपली आणि त्याचे अर्धशतक अवघ्या ६ धावांनी हुकले.
चेतेश्वर पुजाराच्या निवृत्तीनंतर कसोटीत तिसऱ्या क्रमांकावर संयमी आणि भक्कम फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाची उणीव भासत होती. पडिक्कलने (Devdutt Padikkal) या सामन्यात दाखवून दिले की तो ही जबाबदारी पेलण्यासाठी सज्ज आहे. पहिल्या डावातील १६७ आणि दुसऱ्या डावातील ४४ अशा दोन्ही डावांत मिळून त्याने २११ धावा कुटल्या.
या शानदार कामगिरीसह देवदत्त पडिक्कल श्रीलंकेच्या भूमीवर एकाच कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या पंक्तीत थेट दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. त्याने भारताचे महान फलंदाज शिखर धवन (२०४ धावा) आणि सचिन तेंडुलकर (२०३ धावा) यांना मागे टाकले आहे. या यादीत अव्वल स्थानी भारताचा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग असून त्याच्या नावावर एकाच सामन्यात सर्वाधिक २५१ धावा (२०१ आणि ५० धावा) करण्याचा विक्रम नोंदवला गेला आहे.






