Nepal Flood : नेपाळमध्ये महापूर! संकट काळात भारताचा मदतीचा हात, बालेन शाह यांनी मानले आभार
Nepal Flood : पुराच्या पाण्यामुळे वाहने, पूल, रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांचे नुकसान, डझनभर जलविद्युत प्रकल्पांवरही परिणाम

Nepal Flood : नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे आलेल्या भीषण पुराने हाहाकार माजवला आहे. तिबेटच्या सीमेला लागून असलेल्या रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला अचानक आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेकडो नागरिक आणि पर्यटक बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.
यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून भारताकडून शक्य ती सर्व मदत देण्याचे आश्वासन दिले.
त्यानंतर भारताने तातडीने १० टन मदतसामग्री व अत्यावश्यक औषधे पाठविली आहेत. दिल्लीजवळील हिंडन हवाई तळावरून भारतीय हवाई दलाचे सी-१३०जे हे विमान रात्री सुमारे ८.३५ वाजता काठमांडूकडे रवाना झाले. भारताने संकट काळात नेपाळ साठी मदतीचा हात पुढे केल्याने नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
नेपाळच्या पंतप्रधानांच्या कार्यालयाने एक्सवर पोस्ट करत लिहिले की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीवरून साधलेल्या संवादासाठी आणि तीव्र शोकसंवेदनांसाठी खूप धन्यवाद. या कठीण काळात नेपाळसोबत एकजूट दाखवणाऱ्या तुमच्या प्रेमळ शब्दांचे आणि मदतीच्या उदार प्रस्तावाबाबत आम्ही मनापासून कौतुक करतो. एकजुटीची ही कृती आपल्या दोन देशांमधील मैत्रीचे घट्ट बंध दर्शवते, ज्याला आम्ही खूप महत्त्व देतो, असे बालेन शाह यांच्या कार्यालयाने नमूद केले आहे.
Thank you very much, Prime Minister @narendramodi, for your kind call and deep condolences.
We deeply appreciate your warm words of solidarity and your generous offer of assistance to Nepal during this difficult time.
This gesture of solidarity is a reflection of the enduring… https://t.co/VepX2UzxuG
— PMO (@PM_nepal_) August 26, 2026
बचावकार्य वेगाने सुरू
दरम्यान, बुधवारी सकाळी सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास भोटे कोशी नदीला अचानक आलेल्या पुरामुळे रसुवा जिल्ह्यातील तिमुरे आणि आसपासच्या भागात मोठी हानी झाली. पुराच्या पाण्यामुळे वाहने, पूल, रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांचे नुकसान झाले असून किमान डझनभर जलविद्युत प्रकल्पांवरही त्याचा परिणाम झाला आहे. बचावकार्य वेगाने सुरू असून खराब हवामान आणि दुर्गम भौगोलिक परिस्थितीमुळे बचाव पथकांसमोर मोठी आव्हाने आहेत.
नेपाळमधील पूरस्थितीचा परिणाम भारतातील सीमावर्ती भागांवर होण्याची शक्यता लक्षात घेऊन बिहार आणि उत्तर प्रदेशातील काही सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये प्रशासनाला सतर्क करण्यात आले आहे. परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून नदीकाठच्या भागातील नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा:
Khalapur accident : खालापूर फूडमॉलजवळ ट्रक-ट्रेलरचा भीषण अपघात





