Salman Khan : आसाममध्ये जलप्रलय, हजारो नागरिक संकटात; पुरग्रस्तांच्या मदतीला धावून आला सलमान खान
Salman Khan : आता आसाममधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी त्याच्या ‘बीइंग ह्युमन’ (Being Human) या एनजीओमार्फत मदत केली जात आहे.

Salman Khan : सध्या आसाम राज्यात जलप्रकोपाचा हाहा:कार झाल्याचे बघायला मिळत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पुराचं संकट उभं राहिलं आहे. आतापर्यंत अनेक जणांना आपला जीव पुरामुळे गमवावा लागला आहे. तर अनेक जण बेघर झाले असून मोठ्या भीषण परिस्थितीचा सामना या राज्यातील नागरिकांना करावा लागत आहे. मोठ्या संकटात सापडलेल्या आसाम राज्यातील पुरग्रस्तांच्या मदतीला बॅालिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान धावून आला आहे.
खरंतर सलमान खान याअगोदर देखील अनेकदा मदतीसाठी धावून आला आहे. गेल्या वर्षी पंजाबच्या अनेक भागांत मुसळधार पावसामुळे पूर आला होता, ज्यामुळे अनेकांची पिके आणि घरे उद्ध्वस्त झाली होती, त्यावेळीही सलमान मदतीसाठी पुढे आलेला. आता आसाममधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी त्याच्या ‘बीइंग ह्युमन’ (Being Human) या एनजीओमार्फत मदत केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी सलमानच्या एनजीओने आसाममधील आपल्या एका फॅन क्लबशी हातमिळवणी केली आहे. ही मदत त्यांच्यामार्फत पूरग्रस्त भागातील नागरिकांना पाठवली जात आहे. सलामानच्या या मदतीसाठी अनेकांकडून त्याचं कौतुक केलं जात आहे. ज्यावेळी जलसंकट उभ राहिलं त्यावेळी भीषण परिस्थिती पाहून सलमान मदतीसाठी पुढे आला. याची सुरूवात बिस्किटे, गूळ, मुरमुरे आणि ब्रेड यांसारख्या ‘रेडी-टू-ईट’खाद्यपदार्थांच्या वाटपाने झाली. एवढंच नाही तर, सॅनिटरी पॅड्सचं देखील वाटप करण्यात येत आहे.
सलमान मदतीसाठी पुढे आल्यानंतर आता पुरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी निधी एकत्र करण्यासाठी बॉलिवूड पुढे आलं आहे. २५ जुलै रोजी, आसामी गायक पापन याने विशाल ददलानी, दिव्या कुमार आणि निलोत्पल बोरा यांच्यासमवेत इन्स्टाग्रामवर एका ‘लाइव्ह चॅरिटी कॉन्सर्ट’चं आयोजन केलं आणि सुरू असलेल्या मदतकार्यासाठी योगदान देण्याचं आवाहन प्रेक्षकांना केलं.
आसाममध्ये भीषण पूरपरिस्थिती
आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, पुरात ६८ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. ५ लाख २४ हजार नागरिक संकटात आहेत. ७६३ गावं पाण्याखाली आहेत. तर सुमारे ७ लाखांहून अधिक लोक बाधित झाले आहेत. या भीषण परिस्थितीला दोन हात करण्यासाठी राज्यभरातील बचाव आणि पुनर्वसन कार्यात मदत करण्यासाठी अनेक सेलिब्रिटी आणि मानवतावादी संस्था एकत्र आल्या आहेत.





