Bollywood News : बाॅलिवूडवर शोककळा; देव आनंद यांचे सुपुत्र अभिनेते सुनील आनंद यांचे निधन
Bollywood News : ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते दिवंगत देव आनंद यांचे सुपुत्र तथा अभिनेते सुनील आनंद यांचे २६ जुलै रोजी लंडन येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७० वर्षांचे होते.

Bollywood News : ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते दिवंगत देव आनंद यांचे सुपुत्र तथा अभिनेते सुनील आनंद यांचे २६ जुलै रोजी लंडन येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. त्यांच्या निधनाच्या वृत्ताला कुटुंबीयांनी दुजोरा दिला असून, त्यांच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे.
सुनील आनंद यांच्या निधनानंतर त्यांची भाची जीना नारंग यांनी निवेदन जारी केले. त्यात म्हटले आहे की, “अत्यंत दुःखी मनाने आम्ही सुनील आनंद यांच्या निधनाची माहिती देत आहोत. या कठीण काळात मिळालेल्या प्रेम, प्रार्थना आणि पाठिंब्यासाठी आम्ही सर्वांचे आभारी आहोत. कृपया आमच्या कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करावा.”
३० जून १९५६ रोजी स्वित्झर्लंडमधील झ्युरिख येथे सुनील आनंद यांचा जन्म झाला. त्यांचे वडील देव आनंद आणि आई कल्पना कार्तिक हे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार होते. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी त्यांनी अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी येथील अमेरिकन युनिव्हर्सिटीतून बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनचे शिक्षण घेतले.
सुनील आनंद यांनी १९८४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आनंद और आनंद’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटाचे दिग्दर्शन देव आनंद यांनी केले होते. त्यानंतर त्यांनी ‘कार थीफ’ (१९८६), ‘मैं तेरे लिये’ (१९८९) आणि ‘मास्टर’ या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. मात्र, या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळाले नाही.
२०११ मध्ये देव आनंद यांच्या निधनानंतर सुनील आनंद यांनी नवकेतन फिल्म्स या निर्मिती संस्थेची जबाबदारी स्वीकारली होती. त्यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपटसृष्टीने एका शांत, संयमी आणि पडद्यामागे कार्यरत राहिलेल्या व्यक्तिमत्त्वाला गमावले आहे.





